विदर्भात ‘या’ तारखांना गारपीटसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून इशारा
हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात 16 - 17 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे.
अमरावती : गेल्या काही दिवसापासून हवामानात मोठा बदल जाणवतो आहे. वेस्टर्न डिस्टर्बंसच्या प्रभावामुळे विदर्भात किमान तापमान 8.0 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली उतरलं होतं. पण आता आता वेस्टर्न डिस्टर्बंसचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. यासोबतच वारेसुद्धा आता दक्षिणेकडुन वाहायला लागले आहेत यामुळे विदर्भात तापमान वाढ झाली असून कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे. (weather alert Chance of rain with thunderstorm on February 16 and 17 in Vidarbha)
मध्य महाराष्ट्रावर 900 मिटर उंचीवर वाहत असलेले चक्राकार वारे आणि इथुन केरळपर्यंत असलेली कमी दाबाची द्रोणिय स्थिती आणि सोबतच पुर्वेकडुन हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे. या सर्व हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात 16 – 17 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एखाद्या दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील सावध राहण्याचं आवाहन हवामान तज्ञ अनिल बंड यांनी केलं आहे.
दरम्यान, उत्तर मध्य महाराष्ट्रलगत आलेल्या चक्रवातामुळे पुणे शहरात 16 फेब्रुवारीपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते 16 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खरंतर, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस होऊ शकतो. तर मुंबई आणि कोकण परिसर वगळता राज्यातील इतर भागांत 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता इंग्लंडच्या रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी वर्तविली.
कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?
16 तारखेला पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांत वादळी पावसाचा अंदाज आहे. या भागांत कमी प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही, तर उर्वरित राज्यात वादळी पावसाचा अंदाज नाही. 17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे, आणि या भागांमध्ये गारपिटीची शक्यता देखील अधिक राहणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. या दिवशी औरंगाबाद, खानदेश आणि पश्चिम-महाराष्ट्रात मात्र वादळी पावसाची फार शक्यता नसणार.
18 तारखेला मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल. (weather alert Chance of rain with thunderstorm on February 16 and 17 in Vidarbha)
संबंधित बातम्या –
Weather Alert : फेब्रुवारीच्या ‘या’ तारखांना राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा
(weather alert Chance of rain with thunderstorm on February 16 and 17 in Vidarbha)