घ्या.. आता होळीत पाऊस! राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात, शेतकरी संकटात, हवामानाचा अंदाज काय?
अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई : राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीचा उत्साह असतानाच अवकाळी पावसाने नागरिकांच्या आनंदावर विरजण टाकल्याचे चित्र आहे. राज्यात काल संध्याकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी रविवारी संध्याकाळीच पावसाला सुरुवात झाली. विदर्भात नंदूरबार, बुलढाणा आदी ठिकाणी कालच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर आज नाशिक, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच हलक्या सरी कोसळू लागल्यात. या अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाची कुठे कुठे हजेरी?
- आज पहाटे 4 वाजेच्या दरम्यान लासलगावसह परिसरात विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर आठ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. या अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर लासलगाव बाजार समिती व्यापाऱ्याने गोण्यामध्ये ठेवलेला कांदा या पावसाने ओला झाल्याने नुकसान झाले आहे.
- बुलढाण्यात रविवारी जोरदार अवकाळी पाऊस पडला. जवळपास अर्धा तास हा पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकाला धोका निर्माण झाला आहे.
- नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मालेगाव, सटाणा भागात हलक्या सरी तर कळवणच्या पाश्चिम पट्टयात अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. आंबा, गहू, हरबरा, मसूर वाटाणा सह कांदा उत्पादकांना याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
- धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यांमध्ये वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला असून, सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.. काही ठिकाणी गाराही पडल्या तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.. या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे…
8 मार्चपर्यंत पाऊस
5 मार्च: पुढचे 4 दिवस, (5-8 मार्च) राज्यात काही ठिकाणी ढगाळ आकाश, गडगडाटासह पावसाची शक्यता. ? 7 मार्च, मराठवाडा विभागात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता. IMD GFS model guidance for 4 days is here. Watch for IMD updates … pic.twitter.com/VljUqYFdEN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 5, 2023
अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 5 ते 8 मार्च दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, बुलढाणा, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण दिसून आले. तर अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. उद्या म्हणजेच ८ मार्चपर्यंत अशी स्थिती राहिल. त्यानंतर ढगाळ वातावरणी हळू हळू कमी होऊन पुन्हा एकदा ऊन चटकू लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.