आसामचे मुख्यमंत्री राहुल गांधी यांच्याबाबत काय म्हणाले? काँग्रेसने फोटोला काळं फासलं
सीएम बिस्वा शर्मा म्हणाले होते की, राहुल गांधींनी देशाचे पहिले संरक्षण प्रमुख दिवंगत बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला होता. 'तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही, याचा पुरावा मी कधी मागितला आहे का?' असा सवालही त्यांनी केला होता.
मुंबई : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधींची भाषा 1947 पूर्वी जीनांची होती तशीच आहे, असे ते म्हणाले. त्यांनी राहुल गांधींना आधुनिक जिनाही म्हटले आहे. राहुल गांधींच्या आत जिनांचं भूत शिरल्यासारखं वाटतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले. यापूर्वी, उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या (Uttarkhand Elections 2022) प्रचारादरम्यान, सीएम बिस्वा शर्मा म्हणाले होते की, राहुल गांधींनी देशाचे पहिले संरक्षण प्रमुख दिवंगत बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला होता. ‘तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही, याचा पुरावा मी कधी मागितला आहे का?’ असा सवालही त्यांनी केला होता. यावरून राज्यातली युथ काँग्रेस सध्या चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबई युथ काँग्रेसकडून गाढवावर आसामच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आंदोलन करण्यात आले आहे.
फोटोला काळंही फासलं
काँग्रेसने फक्त आंदोलनच नााही केलं. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्या फोटोलाही काळे फासले आहे. मुंबई काँग्रेस कार्यालय या ठिकाणी मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली हे आक्रमक आंदोलन झाले आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आज आम्ही त्यांची प्रतीकात्मक गाढवावरून धिंड काढली. यांच्या फोटोला काळं फासलं आणि राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या फोटोला चपला मारल्या, चपला घातल्या. हिमंत बिस्वा शर्मा यांचा भाजपने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी यावेळी झीशान सिद्दीक्की यांनी केली आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य काय?
लष्कराने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या सांगण्यावर काँग्रेसने विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यात कोणताही वाद नसावा, असेही मुख्यमंत्री बिस्वा शर्मा म्हणाले. एकेकाळी जनरल रावत यांना ‘सडक का गुंडा’ म्हणणारी काँग्रेस आज त्यांच्या नावावर कटआऊट लावून मते मागत आहे, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. जिन्ना यांचा आत्मा राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये स्थिरावला आहे आणि ते जीना जे म्हणायचे, फाळणीसाठी दोषी आहेत त्याबद्दल ते बोलत आहेत. आसाममधील काँग्रेस सरकारच्या अल्पसंख्याक तुष्टीकरणाचे डाग आपणच धुत आहोत, असे ते म्हणाले. नमाजासाठी सुट्टी जाहीर करणारे काँग्रेस नेते उत्तराखंडमध्ये बंद खोल्यांमध्ये मुस्लिम विद्यापीठाचे आश्वासन देत आहेत. देवभूमीत काँग्रेसचा हा मनसुबा भाजप कदापि पूर्ण होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.