2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचं टार्गेट काय? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला
भाजपने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. देशातील 70 केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी दोन या पद्धतीने 140 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. आता हे टार्गेट वाढवून 403 करण्यात आले आहे. त्या निवडणुकीमध्ये भाजपने 140 जागा गमावल्या होत्या. सध्या त्या 140 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी शंभर जागा जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे. या पराभूत झालेल्या 140 जागांची जबाबदारी केंद्रातील प्रत्येक मंत्र्यांना दोन या पद्धतीने देण्यात आली आहे. माझ्याकडे दक्षिण गोव्याबरोबरच दक्षिण मुंबईची जबाबदारी सोपविली आहे. या दोन्ही जागा भाजप जिंकेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
प्रत्येक मंत्र्यांना दोन मतदारसंघांची जबाबदारी
भाजपने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. देशातील 70 केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी दोन या पद्धतीने 140 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली. हे 140 ही मतदारसंघ 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जिंकता आले नव्हते. म्हणून या मतदारसंघाची विशेष तयारी करणे सुरू केले आहे.
दक्षिण गोव्यात काय होणार
केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे दक्षिण गोव्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी आज या मतदारसंघाचा आढावा घेत आपण हा मतदारसंघ जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीयमंत्री राणे बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.
गोव्याच्या जागेबाबत बोलताना राणे म्हणाले, सध्या दक्षिण गोवा मतदारसंघातील 20 पैकी 12 आमदार आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे हा मतदार संघ आम्ही जिंकल्यात जमा आहे. मात्र युद्धात आणि राजकारणात कसर सोडून चालत नाही. म्हणूनच आम्ही या मतदारसंघाची आतापासून तयारी सुरू केली आहे.
आम्ही ग्रामपंचायत ते जिल्हा पंचायत गटापर्यंत केंद्र सरकारने केलेली विकास कामे घेऊन जाणार आहोत. त्या आधारेच आम्ही मते मागणार आहोत. याशिवाय राज्यात डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे ते उत्तम काम करत आहे. त्याचा फायदाही लोकसभेची जागा जिंकण्यासाठी आम्हाला होईल याचा मला आत्मविश्वास आहे, असंही राणे म्हणाले.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्यावतीने राज्यात उद्योजकांना प्रशिक्षण देणारे 200 कोटी रुपये खर्चून एमएसएमई सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव पाठवण्यास राज्य सरकारला सांगण्यात आला आहे. ते झाल्यास राज्यातील युवकांना उद्योगाची प्रेरणा मिळेल आणि प्रशिक्षणही, असे केंद्रीयमंत्री राणे यांनी सांगितलं.