Walmik Karad : जत्रेत सिनेमे दाखवणारा मुलगा कसा बनला धनंजय मुंडेंचा खास? कोण आहे वाल्मिक कराड?
Walmik Karad : मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात एका नावाची चर्चा आहे वाल्मिक कराड. अखेर या वाल्मिक कराडला अटक झाली आहे. हा वाल्मिक कराड कोण आहे? घरगड्याच काम करणारा हा मुलगा आज महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय कसा बनला? या बद्दल जाणून घ्या.
मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे, त्या वाल्मिक कराडला अखरे अटक झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड आज पुण्यात CID ला शरण आला. पण त्याच्यावर कारवाई सध्या खंडणी प्रकरणात होणार आहे. कारण खंडणीच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याची चौकशी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील. हा वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा विश्वासू कसा बनला? मुंडे कुटुंबाशी त्याचा संपर्क कसा झाला? बीड जिल्ह्यात त्याचा प्रभाव कसा वाढत गेला? त्याची दहशत, गुन्हे, आरोप हा वाल्मिक कराड कोण? त्या बद्दल जाणून घ्या.
वाल्मिक कराडची मुंडे कुटुंबाशी भेट कशी झाली?
वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथ गड गावचा. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिकच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. दहावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीला आला. दोन पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून VCR भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकीटाचे पैसे घ्यायचा. आर्थिक प्रगतीसाठी त्याचं हात-पाय मारणं सुरु होतं. त्यावेळी वाल्मिक गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. फुलचंद कराड यांनी त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं. घरात दूध, भाजीपाला, किराण्याच सामान आणायचा. घरगड्याची सगळी काम करु लागला. असं करता, करता, त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला.
गोळी लागली आणि विश्वास वाढला
वाल्मिक कराडला पुढे परळीच्या थर्मल प्लान्टमध्ये कंत्राट मिळवू लागला. पाठिमागे मोठ नाव असल्यामुळे हळूहळू त्याचा परळीत प्रभाव वाढू लागला. वर्ष 1995 मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यावेळी अध्यक्ष निवडीच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी झाली. सभेत राडे सुरु असताना तत्कालिन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या बंदुकीतून निघालेली गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली. त्यानंतर गोपीनथ मुंडे यांचा त्याच्यावरील विश्वास जास्त वाढला.
अशी दोस्ती घट्ट झाली
गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधु पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला. पंडित अण्णांचाही तो खास बनला. पंडित अण्णांचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचे सूर जुळले. दोघांची मैत्री झाली. पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत राहिला. राजकारणात त्याने चांगला जम बसवला. परळीत त्याची दहशत तयार झाली. पुढे धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराडची दोस्ती घट्ट होत गेली. मागच्या दहा वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढल्यानंतर आपोआपा वाल्मिक कराडच्या शब्दालाही मान मिळू लागला. त्यातून पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोण असावा? हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेली असं बोललं जातं. वाल्मिक कराड अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहे.