ST Andolan Mumbai: ज्या भाषणामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले, तो अॅड. सदावर्तेंचा बाईट ऐका
ST Andolan Mumbai : एसटीच्या विलीनिकरणाचा प्रश्न न सुटल्याने एसटी कामगार चांगलेच आक्रमक झाले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरासमोर प्रचंड निदर्शने केली. काही आंदोलकांनी तर घराच्या दिशेने चपला भिरकावल्या.
मुंबई: एसटीच्या विलीनिकरणाचा प्रश्न न सुटल्याने एसटी कामगार चांगलेच आक्रमक झाले (ST Andolan) आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर प्रचंड निदर्शने केली. काही आंदोलकांनी तर घराच्या दिशेने चपला भिरकावल्या. बांगड्या फोडण्यात आल्या. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर होत्या. संतप्त आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी केली आणि शिवराळ भाषेचा वापरही केला. त्यामुळे संपूर्ण वातावरण तापलं होतं. या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. कर्मचाऱ्यांच्या आक्रमक झाले होते. अचानक मोठ्या प्रमाणावर आंदोलक आल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. यानंतर बारामतीत धडक देणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलक अचानक एवढे आक्रमक का झाले? असा सवाल केला जात आहे. काल आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (adv. gunratan sadavarte) यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं होतं. त्यानंतर आज कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सदावर्ते काय म्हणाले?
उच्च न्यायालयाने काल कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व याचिकाही फेटाळून लावल्या. तसेच विलिनीकरणाचा प्रश्नही निकाली काढला. मात्र, कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी, पेन्शन आणि पीएफ आदी देण्यास सांगितलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात जल्लोष केला. आपल्या काही मागण्या मान्य झाल्या म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनीही गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. त्यानंतर गुलालाने माखलेले असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांसमोर आक्रमक भाषण केलं. येत्या 12 एप्रिलला हिंदुस्थानी कष्टकरी बारामतीत येणार आहे. आणि सर्व शरद पवारांची पोलखोल करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध राजकारणी शरद पवार तुम्ही कितीही गलिच्छ राजकारण करा, परंतु आम्हाला 12 तारखेला बारामतीत थांबवून दाखवा. नाही तर तुम्ही बारामतीतून चालते व्हा, असा इशारा सदावर्ते यांनी दिला.
चौकशी होऊन कारवाई होईल
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी होते. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हेही उपस्थित होते. तब्बल तासाभरानंतर आदित्य ठाकरे पवारांच्या घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचं राजकारण कधीही इतकं घाणेरडं झालं नव्हतं. असं कुणाच्याही घरावर आंदोलन झालं नव्हतं. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी होईल आणि कडक कारवाई केली जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या: