नाशिकच्या वोकहार्ट हॉस्पिटलची चौकशी होणार, वेळ पडल्यास मान्यताही रद्द करु- महापौर
वोकहार्ट हॉस्पिटलची चौकशी केली जाणार असल्याची माहिती नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलीय.
नाशिक : राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असताना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. कुठे रुग्णांना बेड मिळत नाही तर कुठे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. अशावेळी खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरु असल्याचे अनेक प्रकार उजेडात येत आहेत. नाशिकच्या वोकहार्ट रुग्णालयात असाच एक प्रकार काल समोर आलाय. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी काल रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करुन रुग्णांची होत असलेली लूट उजेडात आणली होती. त्यानंतर आता वोकहार्ट हॉस्पिटलची चौकशी केली जाणार असल्याची माहिती नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलीय. (Wockhardt Hospital in Nashik will be investigated)
भावे आणि संबंधित रुग्णाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक स्तरातून रुग्णालयावर कारवाईची मागणी केली जात आहे. त्यानंतर अखेर वोकहार्ट हॉस्पिटलची चौकशी केली जाणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिलीय. वेळ पडल्यास हॉस्पिटलची मान्यताही रद्द करु, असंही महापौरांनी म्हटलंय. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नाशिकमधील अवाजवी बिल आकारणाऱ्या अनेक खासगी रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत.
वोकहार्ट रुग्णालयात नेमकं काय घडलं?
जितेंद्र भावे यांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केलं. सद्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. इन्शुरन्स कंपनीकडून बिल मिळून ही हॉस्पिटलने अॅडव्हान्स 1 लाख 50 हजार रुपये परत देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. मात्र हे अवाजवी बिल लावलं आहे, असा रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे अॅडव्हान्स दीड लाख रुपये तरी परत द्या, रुग्णाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. विचार करा अन्यथा जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन करू, असे जितेंद्र भावेंचं मत आहे.
जितेंद्र भावेंविरुद्ध गुन्हा दाखल
वोकहार्ट हॉस्पिटलने कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी करत अर्धनग्न आंदोलन केलं होतं. या आंदोलन प्रकरणी जितेंद्र भावे आणि समर्थकांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे यांच्यावर कलम 188 आणि बेकायदेशीर रित्या गर्दी जमवणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र भावे यांनी मंगळवारी नाशिकमधील नामांकित रुग्णालयात हॉस्पिटलच्या बिलाच्या मुद्यावरुन आंदोलन केलं होतं.
जितेंद्र भावे याचं मत काय?
नाशिक पोलिसांनी जितेंद्र भावे यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. नाशिककरांच्या रेट्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. टीव्ही 9 मराठीशी बोलताना जितेंद्र भावे यांनी भारतीय वैद्यकीय व्यवस्थेतील चुकीच्या कामांविषयी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. “एकंदरीतच कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जो चाललेला खेळ आहे आणि तिथे रुग्णाचे कपडे काढले जातात रोजच्या रोज रुग्णाच्या नातेवाईकांची कपडे काढले जात आहेत. कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि त्यांच्या पंखाखाली असलेले त्यांच्या पॅथॉलॉजिकल लॅब, त्यांच्या पंखाखाली असलेली डायग्नोस्टिक लॅब, चालू असलेले इतर वैद्यकीय व्यवसाय आणि कट प्रॅक्टिस या सगळ्यामुळे भारतीय माणूस पुरता नागवला गेला आहे. एक भारतीय माणूस आणि मी त्याचं प्रतीक म्हणून ते कपडे काढले होते. त्या माणसाला त्याचा हक्काचा डिपॉझिट परत मिळत नव्हतं आणि ते डिपॉझिट घेतल्याशिवाय त्या मुलाच्या आईवडिलांनीही अॅडमिशन दिलं नव्हतं.”,असं जितेंद्र भावे म्हणाले.
संबंधित बातम्या :
VIDEO: नाशिकच्या खासगी रुग्णालयाकडून आकारलं जातंय अवाजवी बिल, सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप
नाशिककरांना दिलासा 5 हजार बेड रिकामे, ऑक्सिजनची मागणी घटली; ‘या’ कारणामुळं चिंता कायम
Wockhardt Hospital in Nashik will be investigated