छत्रपती शिवरायांनी अर्पण केलेले अलंकार, आई भवानी सजली, तुळजापुरात देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी Photo
साडेतीन मुहूर्तापैकी एक
संतोष जाधव, धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (Tuljabhavani) मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा (Gudhipadwa) सण साजरा करण्यात आला. साडे तीन शुभ मुहूर्त पैकी आजचा एक मुहूर्त असल्याने व मराठी नवीन वर्षाचा दिवस असल्याने देवीची अलंकार पुजा करण्यात आली. तुळजाभवानी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन अलंकार घालण्यात आले. यात जय भवानी , राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आलेली सोन्याची माळ,मोती माणिक व रत्नजडीत जरी टोप त्यावर महादेवाची पिंड,मंगळसूत्र असे हे अलंकार घालण्यात आले त्यानंतर पाडवा वाचन करण्यात आले.
देवीची पहाटे आरती करुन तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर गुलाबी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आला. तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा यासह पुजारी भक्तांच्या उपस्थितीत गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण केला.
तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. देवीच्या विधिवत पूजा आज पार पडली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले अलंकार हे प्राचीन आणि विशेष आहेत. देवीला गुडीपाडवा शुभ मुहूर्तावर हे अलंकार घालण्यात येतात. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शारदीय व शाकंबरी नवरात्र उत्सवासह गुढीपाडवा, रंगपंचमी, बैलपोळा, नागपंचमी हे धार्मिक सण साजरे केले जातात. त्यावेळी विशेष अलंकार पूजा केली जाते. त्यारूपात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली असते.
शेगावातही भाविकांची गर्दी
गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्षाची सुरुवात होत असते. नवीन वर्षाचा संकल्प घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात अनेक भाविक शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दर्शनाने करतात.. राज्यभरातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले आहेत.. त्यामुळे संत नगरी शेगावला मोठ्या जत्रेचे स्वरूप आलंय. सकाळपासूनच भाविकांनी शेगावात गर्दी करायला सुरुवात केली आहे.