टीव्ही 9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडेंना पोलिसांकडून धक्काबुक्की
टीव्ही 9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडे यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

माध्यम हे लोकशाहीचा चौथा खांब आहे. जनतेची गाऱ्हाणी, सामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या सरकारच्या दरबारी पोहोचवण्याचे काम माध्यमे करतात. सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवण्याचेही काम माध्यमे नेटाने करतात. मात्र मराठी माध्यमांत सर्वांत आघाडीवर असणाऱ्या टीव्ही 9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. या घटनेनंतर सामान्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सामान्यांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांनाच मारहाण होत करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कठोरातील कठोर कारवाई कारवी, अशी मागणी केली जात आहे.
10 ते 12 पोलिसांनी घातली हुज्जत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभास्थळी प्रवेश देण्यावरून पोलिसांनी विवेक गावंडे यांना धक्काबुक्की केली आहे. एकूण 10 ते 12 पोलीस कर्मचाऱ्यांनी एकूण पत्रकारांशी हुज्जत घातली आहे.
नेमकं काय घडलं?
टीव्ही 9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडे यांनी त्यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडला, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यवतमाळ येथे एकनाथ शिंदे यांची आभार सभा आयोजित करण्यात होती. या सभास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र तपासणीच्या ठिकाणी पोलिसांनी काही पत्रकारांशी हुज्जत घातली. पोलिसांकडून माध्यम प्रतिनिधींना अडवण्यात आले तसेच मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन हा वाद सोडवला.
कॉलर धरून ओढाताण, मारहाण
पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींनी कॉलर धरून, ओढाताण करून मारहाण केली आहे. पत्रकारांना आत जाण्यास मज्जावही करण्यात आला. पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना अडवले होते. त्याबाबत जाब विचारण्यासाठी टीव्ही 9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडे गेले होते. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली, याघटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला असून मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.