मुंबईतील चोरीच्या सोन्याची यवतमाळमध्ये विक्री! मुंबई पोलिसांची यवतमाळमध्ये धाड, एकाला ताब्यात घेतलं
Yavatmal Crime news : फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल 4 कोटींच्या सोने चांदीची यवतमाळात विक्री झाल्याच्या संशयावरून मुंबईचे पथक यवतमाळेत धडकले.
यवतमाळ : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police News) यवतमाळमध्ये धाड टाकून एका सराफा व्यापाऱ्याला ताब्यात घेतलंय. चोरीच्या सोन्याची खरेदी केल्याप्रकरणाच्या संशयावरुन चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळमधील (Yavatmal) सराफा बाजारात खळबळ माजलीय. मुंबई पोलिसांनी थेट यवतमाळमध्ये जाऊन दोन सोन्याच्या दुकानांची झाडाझडती घेतली. त्या दरम्यान, एका दुकानातील सोन्याबाबत शंका आल्यानं पोलिसांनी खबरदारी म्हणून सराफा विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक पोलीस स्थानकाच्या पथकाने ही कारवाई केली असून तब्बल चार कोटी रुपयांच्या सोने आणि चांदीच्या (Gold And Silver Theft) अपहारप्रकरणी तपास सुरु आहे. विशेष म्हणजे सराफा व्यापाऱ्याच्या नातेवाईकानेच याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत प्राथमिक माहितीच्या आधारे थेट यवतमाळ गाठलं आणि झाडाझडती घेतली.
नेमकं काय प्रकरण?
फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल 4 कोटींच्या सोने चांदीची यवतमाळात विक्री झाल्याच्या संशयावरून मुंबईचे पथक यवतमाळेत धडकले. यावेळी त्यांनी यवतमाळतील दोन सराफा व्यापाऱ्यांची चौकशी केली. गुन्ह्यामध्ये तथ्य आढळल्याने यातील एकाला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. गजानन तनसुकराय अग्रवाल (38) रा. राजस्थान असे आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी हा पूर्वी यवतमाळ येथे वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई मध्ये लोकमान्य टिळक पोलीस स्टेशन येथे आरोपीचा नातेवाईक असलेल्या सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरूनच अपराध क्रमांक 835/ 22 मध्ये 420, 409 कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला अटक केल्यानंतर चौकशी मध्ये त्याने जवळपास 1500 ग्रॅम सोने व 35 किलो चांदी, असा एकूण अंदाजे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल परस्पर यवतमाळ येथील दोन व्यापाऱ्यांना विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई पोलिसांची यवतमाळमध्ये धाड
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीवरुन मुंबई येथील लोकमान्य टिळक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील कुमार वंजारी हे आपल्या पथकासह यवतमाळ येथे दाखल झाले. दरम्यान आरोपीने त्यांना यवतमाळ येथील दोन सराफा व्यापाऱ्यांची दुकाने दाखविली. यावेळी पोलिसांनी संबंधित दोन्ही दुकानांची झाडाझडती घेतली. दरम्यान एका दुकानांमध्ये चोरी केलेल्या सोन्याची खरेदी करण्यात आल्याप्रकरणी तथ्य आढळून आलं. त्यामुळे याप्रकरणी संबंधित सराफा व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणामुळे सराफा व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.