या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले
ही बाब बगीरा याला कळताच तो इतर साथीदारांना घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहचला. त्यानंतर बगीरा गँगने वाद झालेल्या युवकांवर धारदार चाकूने हल्ला चढविला. यात दोन युवक गंभीर जखमी झाले होते.
यवतमाळ : येथे क्षुल्लक कारणावरून काही गुन्हेगारी घटना घडल्या. कुख्यात बगीरा गँगमधील तब्बल बारा जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. यवतमाळ (Yavatmal) शहर पोलिसांनी गुन्हेगारांवरील (Criminals) कारवाईचा प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला. शुक्रवारी ३ फेब्रुवारीला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजूर केला. नवीन वर्षात आतापर्यंत दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळं गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
अशी आहेत आरोपींची नावं
आशिष उर्फ बगीरा दांडेकर (रा. चांदोरेनगर), धिरज उर्फ ब्रॅन्ड मैद (रा. वंजारी फैल), विशाल वानखडे (रा. बांगरनगर), स्तवन शहा (रा. विश्वशांतीनगर), लोकेश बोरखडे (रा. विसावा कॉलनी), वंश राऊत (रा. बांगरनगर), दिनेश तुरकने (रा. पुष्पकनगर, बाभूळगाव), प्रज्वल मेश्राम (रा. आकृती पार्क), ऋषीकेश उर्फ रघू रोकडे (रा. अभिनव कॉलनी), मनीष बघेल (रा. वैभवनगर), लखन अवतडे (रा. जामवाडी) आणि आकाश विरखडे (रा. एकतानगर, वाघापूर) अशी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या बगीरा गँगमधील सदस्यांची नावे आहेत.
वादात दोन्ही गटातील युवक जखमी
यवतमाळ शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या एका धाब्यावर पाच डिसेंबरला कुख्यात बगीरा गँगच्या सदस्यांचा इतर जेवन करीत असलेल्या युवकांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. यात दोन्ही गटातील जखमी युवक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेले होते.
धारदार चाकूने हल्ला चढविला
ही बाब बगीरा याला कळताच तो इतर साथीदारांना घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहचला. त्यानंतर बगीरा गँगने वाद झालेल्या युवकांवर धारदार चाकूने हल्ला चढविला. यात दोन युवक गंभीर जखमी झाले होते.
रुग्णालयातील पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी धाव घेतली. त्या युवकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बगीरा गँगने कर्मचाऱ्यांना धक्का देत त्या ठिकाणाहून पळ काढला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये बगीरा गँगमधील बारा जणांवर गुन्हे नोंद केले होते.
१२ जणांना घेतले होते ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी बारा जणांना ताब्यात घेतले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कलम वाढीस परवानगी मिळण्याबाबत शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांनी प्रस्ताव तयार केला होता. तो प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.