पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातमधील तरुणाला हवीय राज ठाकरे यांची मदत, म्हणाला, एकही नेत्याने तिरडी…
राज ठाकरे यांच्या बेधडक भाषणामुळे प्रभावित झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने ट्विट करून हिंदूंचे भविष्य वाचविण्याची विनंती केली आहे. लिंकन सोखडिया असे या तरुणाचे नाव आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत अजान विरोधात भूमिका घेतली होती. लाऊड स्पीकरवरून देण्यात येणारी अजान बंद केली नाही तर मस्जिदीसमोर भोंगे लावून त्यावर हनुमान चाळीस वाजवू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यापाठोपाठ त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. त्यावेळी ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे है भगवाधारी’ असे ठिकठिकाणी बॅनर झळकावून राज्यात वातावरण निर्मिती करण्यात आली. याचदरम्यान राज ठाकरे यांनी पुणे, संभाजीनगर येथे सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. आताही गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात सभा घेतली.
शिवाजी पार्क येथील सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला. तुमच्याकडे शिवसेना नाव आहे. मशिदींवरील भोंगे बंद करा. सतरा हजार मनसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या. मस्जिदीवरील लाऊडस्पिकर बंद करा. नाही तर आम्ही ते बंद करतो. मी विषय सोडलेला नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.
नवीन हाजी अली
प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले त्याबद्दल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. पण, याच सभेत त्यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा दावा करत एक व्हिडीओ दाखवला. माहीम येथे इतिहासकालीन दर्गा आहे. परंतु, त्याच्या पुढे काही बांधकाम अनधिकृतपणे समुद्रात उभे केले. पोलीस स्टेशन जवळ आहे. महापालिकेचे लोक आहेत. पण त्यांचे लक्ष नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर नवीन हाजी अली तयार करणार का असा सवाल त्यांनी केला होता.
प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस कमिशनर, महापालिका आयुक्तांना यांनी महिन्याभरात त्यावर करवीर केली नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठे गणपती मंदिर उभे करू. वाट्टेल ते फाजील चाळे चालणार नाही. माझ्याकडे राज्य आले तर राज्य सुतासारखं सरळ करेन. कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.
अहमदाबाद’चा प्रसिद्ध चांडोळा तलाव
राज ठाकरे यांच्या याच बेधडक भाषणामुळे प्रभावित झालेल्या गुजरातमधील एका तरुणाने ट्विट करून हिंदूंचे भविष्य वाचविण्याची विनंती केली आहे. लिंकन सोखडिया असे या तरुणाचे नाव आहे. ‘अहमदाबाद’चा प्रसिद्ध चांडोळा तलाव आता नामशेष झाला आहे. इथला निम्मा तलाव बेकायदेशीरपणे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी पचवला आहे. हे संपूर्ण गुजरातला माहीत आहे, असे या तरुणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
लिंकन सोखडिया आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतो, ‘येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगार लपून बसले आहेत. इथे एक नाही तर अनेक मशिदी आणि मदरसे बांधण्यात आले आहेत. आत्तापर्यंत गुजरातच्या एकाही नेत्याने तिरडी पाहिली नाही किंवा याबाबत आवाज उठवला नाही. निदान एक द्विट तरी करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या अज्ञानी हिंदूंचे भविष्य वाचेल.’