नारायण राणेंचा जिथे पराभव झाला, तिथून मुंबईचे महापौर विधानसभा लढणार?
ज्या मतदारसंघात नारायण राणे हरले, त्याच मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानातून उतरण्याची तयारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.
संदेश शिर्के, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी इच्छा महाडेश्वर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे मातोश्रीच्या अंगणातील मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी विश्वसनाथ महाडेश्वर इच्छुक आहेत.
सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघाचं नेतृत्त्व शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे तृप्ती सावंत यांचे पती प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडून तृप्ती सावंत तर काँग्रेसकडून नारायण राणे मैदानात होते. त्यावेळी नारायण राणे यांनी तृप्ती सावंत यांना फाईट दिली होती. मात्र तृप्ती सावंत यांनीच बाजी मारत तब्बल 19 हजार मतांनी राणेंवर विजय मिळवला होता.
ज्या मतदारसंघात नारायण राणे हरले, त्याच वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानातून उतरण्याची तयारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.
विश्वनाथ महाडेश्वर हे सध्या देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबईचं महापौरपद भूषवत आहेत. 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 84 जागा मिळवल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांची महापौरपदी निवड झाली.