‘लिटिल मोअर’ला नो मोअर चान्स! ऑनलाईन परीक्षा घोळामुळे मुंबई विद्यापीठाने काम काढून घेतलं!
ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी 'लिटिल मोअर इनोव्हेशन' या कंपनीला दिलेलं काम मुंबई विद्यापीठाने काढून घेतलं
मुंबई : पदवी अंतिम वर्ष दूरस्थ आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉलच्या) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांसाठी मुंबई विद्यापीठाकडून नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. ‘लिटिल मोअर इनोव्हेशन’ या कंपनीकडून मुंबई विद्यापीठाने काम काढून घेतलं. (Mumbai University announce new tender for final year online exams)
अंतिम वर्षाच्या दूरस्थ आणि मुक्त अध्ययन संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने नव्याने निविदा मागवल्या आहेत. या निविदा आज (गुरुवार 15 ऑक्टोबर) रात्री 10.30 वाजता खुल्या करण्यात येणार आहेत.
‘आयडॉल’च्या विद्यार्थ्यांची परीक्षा 3 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. परीक्षा घेण्यासाठी ‘लिटिल मोअर इनोव्हेशन’ या कंपनीला विद्यापीठाने काम दिलं होतं. मात्र परीक्षेच्या पहिल्या पेपरपासूनच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसाठी लिंक, लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळत नसल्याचे प्रकार घडत होते.
आयडॉल विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजनावरुन मोठा तांत्रिक घोळ निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मनःस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे आंदोलनही केलं होतं. 19 तारखेपासून पुन्हा नवे वेळापत्रक जाहीर करुन परीक्षा घेण्याचे आव्हान मुंबई विद्यापीठापुढे आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली होती. मुंबई विद्यापीठाने या गोंधळाचे खापर सायबर हल्ल्यावर फोडले होते. वांद्र्यातील बीकेसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या गुरुवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या ऑनलाईन परीक्षा अत्यंत सुरळीत पार पडल्याचा दावा मुंबई विद्यापीठ प्रशासनाने केला होता. दोन दिवसांत एकूण 2 लाख विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा दिल्याचे विद्यापीठाने सांगितले होते. तसेच काही विद्यार्थी काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देऊ शकले नसतील तर, त्यांनाही पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असेही विद्यापीठाने सांगितले आहे. (Mumbai University announce new tender for final year online exams)
मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, परीक्षा मंडळाकडून घोषणाhttps://t.co/NanMu5D6dd#MumbaiUniversity #OnlineExam
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2020
संबंंधित बातम्या :
मुंबई विद्यापीठ सायबर क्राईममध्ये तक्रार करणार : प्रदीप सावंत
मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, परीक्षा मंडळाकडून घोषणा
(Mumbai University announce new tender for final year online exams)