तीन उदाहरणं देऊन पूनम महाजनांना उत्तर, पवारांच्या समर्थनार्थ नातू रोहित पवार मैदानात
मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) मैदानात उतरले आहेत. रोहित पवार यांनी गिरीश महाजन, गिरीश बापट आणि राम कदम या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांची […]
मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) मैदानात उतरले आहेत. रोहित पवार यांनी गिरीश महाजन, गिरीश बापट आणि राम कदम या भाजप नेत्यांच्या वक्तव्यांची उदाहरणं देऊन, पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांच्या समर्थनार्थ नातू रोहित पवार मैदानात उतरल्याने सोशल मीडियासह सर्वच स्तरातून रोहित पवारांच्या प्रत्युत्तराची सध्या चर्चा सुरु आहे.
रोहित पवार यांनी पूनम महाजनांना काय प्रत्युत्तर दिले?
गिरीष महाजन म्हणाले होते, “दारूच्या ब्रॅण्डला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा.”
गिरीष बापट म्हणाले होते, “तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहित आहे, तुम्ही मला म्हातारे समजू नका, या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे.”
राम कदम म्हणाले होते, “पोरी पटत नसतील तर पळवून आणा मी तुमच्या पाठीशी आहे…
आत्ता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हि विधाने करण्यात आली तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता.
रोहित पवार कोण आहेत?
रोहित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आहेत. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे आहेत. नात्या-गोत्याच्या पलिकडेही रोहित पवार यांची खास ओळख म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरुणांमध्ये मिळून-मिसळून राहणारे, थेट संवाद साधणारे आणि तरुणांमध्ये उद्योजकता वाढावी, शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी काम करणारे युवा नेते म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे. बारामती आणि आजूबाजूच्या परिसरातील राजकारणात त्यांचा सक्रीयपणे वावर असतो. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून रोहित पवार हे धडाडीने काम करत आहेत. शेती आणि त्यासंबंधीचे उद्योग यात रोहित यांना अधिक रस आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. ‘सृजन’ उपक्रमाच्या माध्यमातून रोहित पवार करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. राजकारण आणि वैयक्तिक व्यवसाय अशा दोन आघाड्यांवर अत्यंत सहजपणे आणि तितक्याच प्रभावीपणे रोहित पवार काम करत आहेत.
पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?
“तुम्ही दाखवत असाल की, सगळ्यांचे ऐकत आहात. मात्र, शकुनी मामा सारखं सगळ्या ठिकाणी नाक लावून लावून महाभारत सुरु केलं, असे आपण शरद पवार आहात. अशी महागठबंधनची गोष्ट आहे. बघितलं ना, शकुनी मामा कसा असतो? स्वत:ला मिळालं नाही ना, तर इकडचं तिकडे आणि तकडचं इकडे. मंथरा असो शकुनी मामा असो, हे महागठबंधनचे चेहरे आहेत.” असे खासदार पूनम महाजन म्हणाल्या होत्या.
VIDEO : पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?
दरम्यान, याआधी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत पोस्टरमधून खासदार पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. “अहो, चिऊताई, महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या… देश की जनता यह जानना चाहती हैं, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?” असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विचारला आहे.
जितेंद्र आव्हाडांचंही पूनम महाजनांवर टीकास्त्र
“प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार नाहीत. पण दोघांचेही (शरद पवार आणि प्रमोद महाजन) संबंध होते, त्याची तरी आपल्याला आठवण यायला हवी होती.” असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पूनम महाजनांवर टीका केली.