Ram Mandir | 101 किलो सोनं, 11 कोटींचा मुकुट.. राम मंदिरासाठी खुल्या हाताने दान, कोणा-कोणाचं नाव ?
Ayodhya Big Donors List : नामवंत उद्योगपती मुकेश अंबानीपासून अनेक दिग्गजांनी अयोध्या राम मंदिरासाठी देणगी दिली आहे. कुणी 101 किलो सोनं तर कुण्या अब्जाधीशने 11 कोटी रुपयांचा मुकुट भेट दिला आहे. राम मंदिरासाठी सर्वात मोठं दान कोणी दिलं ते जाणून घेऊया.
Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारीला पूजा संपन्ना झाली. या सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते, सेलिब्रिटीही आवर्जून उपस्थित होते. तसेच या सोहळ्यासाठी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. अब्जाधीशांपासून ते देशातील इतर दिग्गजांनीही राम मंदिरासाठी आपापलं योगदान दिलं आहे. कोणी कोट्यवधी रुपयांचं दान दिलं तर कोणी शेकडो किलो सोनंही दिलं. राम मंदिरासाठी सर्वात मोठं दान कोणी दिलं ते जाणून घेऊया.
मंदिराकडून मिळालं सर्वात मोठं दान
पाटणा येथील महावीर मंदिराने अयोध्येतील राम मंदिरासाठी 10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. महावीर मंदिराने 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये राम मंदिरासाठी प्रत्येकी 2 कोटी रुपयांची देणगी दिली. कोणत्याही मंदिरातर्फे मिळालेली ही 10 कोटी रुपयांची देणगी सर्वाधिक आहे. पाटणा महावीर मंदिराने सोन्याचे धनुष्य आणि बाणही भेट दिले आहेत.
कोणी दिलं सर्वाधिक दान ?
वैयक्तिक देणग्यांबद्दल सांगायचं झालं तर, भव्य राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च दान (राम मंदिर दान) हे आध्यात्मिक गुरू आणि कथाकार मोरारी बापू यांनी दिले आहे. त्यांनी राम मंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राम मंदिरासाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
अंबानी कुटुंबियांनीही केलं दान
मुकेश अंबानी कुटुंबातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मुकेश अंबानी यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपये दान केले आहेत. 22 जानेवारीला मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, आकाश आणि अनंत, श्लोका मेहता आणि राधिका मर्चंटसोबत अयोध्येला पोहोचले होते.
101 किलो सोनं दान
तर सुरतमधील एका व्यावसायिकाने राम मंदिरासाठी आतापर्यंत सर्वाधिक देणगी दिल्याचा दावा केला जात आहे. हिरे व्यापारी दिलीप कुमार लाखी यांनी 101 किलो सोने दान केले आहे. त्याची किंमत अंदाजे 68 कोटी रुपये आहे. या सोन्याचा वापर दरवाजा, त्रिशूळ आणि डमरूमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
11 कोटींचा मुकूट दान
तर सुरतमधील एक व्यापारी मुकेश पटेल याने श्रीरामाच्या मूर्तीसाठी 11 कोटी रुपयांचा मुकूट दान केला. त्यामध्ये 4 किलो सोन्यासह अनेक हिऱ्यांचा वापर करण्यात आला असून त्या मुकूटाचे वजन 6 किलो आहेय
गौतम अदानी यांनी घेतला मोठा निर्णय
अब्जाधीश गौतम अदानी यांच्या देणगीची माहिती सार्वजनिक केलेली नाही. मात्र एका रिपोर्टनुसार , अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मारने फॉर्च्यून ब्रँडसोबत अभिषेक सोहळ्यासाठी प्रसाद तयार केला होता. याशिवाय अदानी समूह इंडोलॉजीमधील 14 विद्यार्थ्यांची पीएचडी प्रायोजित करणार आहे., असे अदानी यांनी नमूद केले होते.