15 राज्य, 6700 किमीचा प्रवास, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी देतील का करारा जवाब?
Bharat Jodo Nyaya Yatra | राहुल गांधी पुन्हा एकदा भारत पिंजून काढणार आहेत. यापूर्वी त्यांनी दक्षिण-उत्तर असा संवाद साधला होता. आता ते पूर्व-पश्चिम असा भारत दौरा करत आहेत. हा दौरा सुरु होण्यापूर्वीच मुंबईत मोठी घडामोड घडली. काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला.
नवी दिल्ली | 14 जानेवारी 2024 : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून सुरु होत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंफाल येथून ही यात्रा सुरु होत आहे. 20 मार्च रोजी मुंबईत यात्र संपेल. इंफाल येथून यात्रेचा श्रीगणेशा होत आहे. त्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यात्रा थौबल जिल्ह्यातील खांगजोम येथून सुरु होत आहे. 66 दिवसांत ही यात्रा 15 राज्यातील जनतेशी संवाद साधत पुढे जाईल. पदयात्रा आणि बसच्या मदतीने ही यात्रा पूर्ण करण्यात येणार आहे. या दरम्यान राहुल गांधी जागोजागी थांबून स्थानिक लोकांशी संवाद साधतील. तसेच जाहीर सभा पण घेतली. 67 व्या दिवशी मुंबईत यात्रेचा समारोप होईल.
INDIA आघाडीचे नेते उपस्थित
1891मध्ये एंग्लो-मणिपूर युद्धातील शहीदांच्या स्मरणार्थ खांगजोम येथे स्मारक उभारण्यात आले आहे. 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्याचे उद्धघाटन केले होते. या ठिकाणाहून राहुल गांधी यांच्या यात्रेचा जयघोष होईल. त्यानंतर ते थोबल येथे मोठी सभा होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे हे भारत जोडो न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील आणि यात्रा सुरु होईल. या यात्रेत इंडिया आघाडीचे अनेक नेते सहभागी होणार आहेत .
15 राज्य, 110 जिल्ह्यांतून संवाद
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत आहे. ही यात्रा 15 जिल्हे आणि देशातील 110 जिल्ह्यातील जात आहे. 100 लोकसभा मतदार संघ आणि 337 विधानसभा मतदार संघातून जनतेशी संवाद साधण्यात येईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही काँग्रेस पक्षाची मशागत असल्याची चर्चा आहे. या निवडणूकीपूर्वीच्या रंगीत तालमीतून विजयासाठी जमीन तयार करण्यात येत असल्याचा राजकीय विश्लेषकांचा व्होरा आहे.
या राज्यातून जाणार यात्रा
मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि सर्वात अखेरीस महाराष्ट्रात ही यात्रा दाखल होईल. शनिवारी या यात्रेसंदर्भात काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. त्यात काँग्रेस पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी माहिती दिली. ही यात्रा एक वैचारिक लढाई आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अन्यायाविरोधात काँग्रेसने एल्गार पुकारल्याचे त्यांनी सांगितले. ही वैचारिक लडाई असल्याचे ते म्हणाले.