Delhi Heroin Siezed : राजधानी दिल्लीत तब्बल 434 कोटींचे हेरॉईन जप्त; डीआरआयची मोठी कारवाई
हेरॉईनचा संपूर्ण साठा एका एअर कार्गोतून ताब्यात घेण्यात आला. एअरकार्गो मॉड्युलमधून जप्त करण्यात आलेला हा सर्वात मोठा अंमली पदार्थ साठा आहे. हे ड्रग्ज दुबईमार्गे दिल्लीत आणले गेले होते. ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) अमली पदार्थविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. डीआरआयने दिल्लीतून तब्बल 434 कोटी रुपयांचे हेरॉईन (Heroin) जप्त केले आहे. हे सुमारे 62 किलो हेरॉईन असल्याची माहिती डीआरआयमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. अलीकडच्या काळात परदेशातून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तस्करांनी डोके वर काढल्यामुळे डीआरआयने कारवाईचा फास आवळला आहे. याचदरम्यान दिल्लीत मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप् (Seized)त करण्यात डीआरआयला यश आले आहे. या कामगिरीबद्दल डीआरआयचे वरिष्ठ प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे.
The Directorate of Revenue Intelligence has seized 62kg Heroin, valued at Rs 434 crores in the illicit market. This is one of the biggest seizures of Heroin till date through courier, cargo, air passenger modes in India: Directorate of Revenue Intelligence
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 11, 2022
एअर कार्गोतून ताब्यात घेण्यात आला अंमली पदार्थाचा साठा
हेरॉईनचा संपूर्ण साठा एका एअर कार्गोतून ताब्यात घेण्यात आला. एअरकार्गो मॉड्युलमधून जप्त करण्यात आलेला हा सर्वात मोठा अंमली पदार्थ साठा आहे. हे ड्रग्ज दुबईमार्गे दिल्लीत आणले गेले होते. ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्याच गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने कारवाई आणि तपासाची पुढील चक्रे फिरवली होती. याच अंतर्गत 10 मे रोजी एक ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनला ‘ब्लॅक अँड व्हाईट’ असे नाव देण्यात आले.
हरियाणा आणि लुधियानामध्येही छापे
डीआरआयचे पथक घटनास्थळी पोहोचले असता एका मालवाहू विमानातून 55 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. अंमली पदार्थांची ही मोठी खेप युगांडातून दुबईमार्गे दिल्लीला नेण्यात आली. चौकशीनंतर इतर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. एअरकार्गोमधून 55 किलो हेरॉईनची ही खेप पकडल्यानंतर एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. त्यानंतर या व्यक्तीच्या चौकशीच्या आधारे हरियाणा आणि लुधियाना येथे छापे टाकण्यात आले. या छाप्यात 7 किलो हेरॉईन आणि 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
या कारवाईनंतर अधिक तपासातून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ज्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाला दिल्लीतून तर दोघांना लुधियानामधून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या प्रवीणला साकेत न्यायालयात, तर इतर दोघांना लुधियाना न्यायालयात हजर केले जाणार आहे. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याकामी अशाच कारवाईच्या मोहिमांची गरज असून डीआरआयने कारवाईचा धडाका सुरु ठेवून तस्करांच्या नांग्या ठेचण्याचा निर्धार केला आहे.