गोव्यात आलेल्या कॉर्डेलिया जहाजात 66 कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन उतरण्याची परवानगी देणार?
परदेशातून गोव्यात आलेले 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोव्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या प्रवाशांना क्रूजमधून उतरण्याची परवानगी द्यायची की नाही? याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल अशी माहिती गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
गोवा : सध्या ओमिक्रॉन आणि कोरोनाने देशासह महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. त्याचबरोबर गोव्याचीही चिंता वाढली आहे. परदेशातून गोव्यात आलेले 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोव्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या प्रवाशांना क्रूजमधून उतरण्याची परवानगी द्यायची की नाही? याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल अशी माहिती गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. विश्वजीत राणे यांनी ट्विट करत याबाबत कळवले आहे.
कॉर्डेलिया जहाजातील 2000 नमुन्यांपैकी 66 प्रवाशांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह आढळली आहे. इथल्या कलेक्टर आणि एमपीटी कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे. जहाजातून प्रवाशांना खाली उतरवण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय अधिकारी घेतील, असे ट्विट गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
गोव्यात रुग्णसंख्येची स्फोटक वाढ होण्याची भिती
नववर्षाच्या स्वागताला देशविदेशातून पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. त्यामुळे आता गोव्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हैराण करून सोडलेल्या कोरोनाचे रुग्ण मागील काही महिन्यात घटल्याने काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. काल मुंबईतही 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासन कठोर पावलं उचलत आहे. काल महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांनी अकरा हजारांचा आकडा पार केला आहे, त्यामुळे राज्यातले निर्बंधही आणखी कडक होण्याची शक्यता आहे. वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचा धोका ओळखून देशभरात आजपासून मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.