गोवा-हैदराबाद ट्रव्हल्स बसला भीषण अपघात, अपघातानंतर ट्रव्हल्सच्या गाडीने घेतला पेट, 7 जण जागीच ठार, 13 जण गंभीर जखमी
धडकेनंतर ट्रॅव्हल्सच्या गाडीला आग लागल्याने मृतांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते आहे. घटनास्थळी कर्नाटक पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे.
कुलबर्गी – गोव्याहून हैदराबादला (Goa)जाणाऱ्या बसचा कर्नाटकात भीषण अपघात (Karnatak Accident) झाला आहे, या अपघातात सात प्रवासी जागीच (Accident Death) ठार झाले असून तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकच्या कुलबर्गी परिसरात हा अपघात घडला आहे. गोव्याहून हैदराबादला जाणारी ट्रॅव्हल्स मिनी बसला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. धडकेनंतर ट्रॅव्हल्सच्या गाडीला आग लागल्याने मृतांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते आहे. घटनास्थळी कर्नाटक पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघाताने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. यातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या भीषण अपघाताने तोपर्यंत सात लोकांचा जीव घेतला होता.
कसा झाला अपघात?
बस एका टेम्पो ट्रॅव्हलरला धडकली आणि स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती पुलावरून पडली, त्यानंतर बसला आग लागली. या दुर्दैवी घटनेने सात प्रवाशांचा जीव घेतला. किमान 15-20 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये चालक आणि दोन क्लिनरसह एकूण 35 लोक होते.
आग लागल्याने प्रवाशांची पळापळ
स्थानिकांच्या सांगण्यानुसार अपघातानंतर खासगी बसला आग लागल्याने अनेक प्रवाशांची मोठी पळापळ झाली. मालवाहू टेम्पोच्या चालकासह अनेक प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर आता कलबुर्गी येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही प्रवाशांना बाहेर पडण्यात यश मिळालं
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बसला आग लागल्यानंतर त्या बसमधून 22 प्रवाशांना सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र काही प्रवासी तसेच अडकून राहिले. बिदर-श्रीरंगपटना महामार्गावर कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर तालुक्याच्या बाहेरील भागात सकाळच्या सुमारास ही घटना घडली. कलबुर्गी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की प्राथमिक तपासानुसार जळालेल्या बसमध्ये 7 ते 8 प्रवासी अडकले असल्याचा संशय आहे. आत्ताच एकूण मृतांचा आकडा सांगणे कठीण आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.