Murder : दिल्लीत नोएडातल्या मॉलमध्ये मर्डर, बिहारच्या तरुणाला बाऊन्सर्सनी तुडवू तुडवू मारलं
वादानंतर बार स्टाफ आणि बाऊन्सरने त्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
नोएडा : दिल्ली (Delhi) हे दिलवांलो की असे म्हटले जाते. येथे लोक जीव लावणार असतात असे ही म्हटले जाते. पण आताची दिल्ली ही दिलवांलो की न राहता बाऊन्सर्सची (Bouncers) झाली आहे. जेथे जाल तिथे हे असतातच मग ती मौजमजा करण्याची जागा पब असो की एखादी पार्टी. बाऊन्सर्स हे तेथील व्यवस्था अबाधित रहावी म्हणून असतात. मात्र एका मॉलमध्ये बाऊन्सर्सांनीच एका तरुणाचा जीव घेतल्याचे आता समोर आले आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीला लागून असलेल्या यूपीच्या नोएडा येथील आहे. येथे असणाऱ्या गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये पार्टीदरम्यान गोंधळ झाला. त्याचे रूपांतरण एका 35 वर्षीय व्यक्तीला मारहाणीत झाली. ज्यात त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती ही ब्रिजेश राय असून ती बिहारमधील (Bihar) छपरा येथील रहिवासी होती. आता या प्रकरणी पोलिसांनी गार्डन गॅलेरियाच्या लॉस्ट लेमन बारच्या 8 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर ब्रिजेशला मारहाण करणे आणि त्यात त्याच्या मृत्यस कारणीभूत ठरणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
बाऊन्सरने त्याला बेदम मारहाण केली
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृत ब्रिजेश राय त्याच्या कंपनीने आयोजित केलेल्या पार्टीत गार्डन गॅलेरियाच्या लॉस्ट लेमन बारमध्ये सोमवारी पोहोचला होता. तेथे त्याचा बारच्या कर्मचाऱ्यांशी काही गोष्टीवरून वाद झाला. हा वाद पैशावरून झाल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. या वादानंतर बार स्टाफ आणि बाऊन्सरने त्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ई-रिक्षाची बॅटरी बनवणाऱ्या कंपनीत कामाला
मृत ब्रिजेश राय हा नोएडा येथील जेएलएन नावाच्या कंपनीत काम करत होता, जी ई-रिक्षाची बॅटरी बनवते. कंपनीने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठीच तो तेथे पोहोचला होता. तो छपराच्या हसनपुरा येथील रहिवासी होता. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करत आहेत. बारमधील 14 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासात आठ जणांची ओळख पटली आहे.
पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले
या प्रकरणाबाबत नोएडाचे अतिरिक्त डीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, ब्रिजेशवर बारमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. याबाबत आम्हाला माहिती मिळताच, आम्ही घटनास्थळी पोहोचून या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, बारमध्ये ही घटना घडत असताना पोलिसांना याची माहिती देण्यात आली नव्हती, मात्र आम्हाला माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते.
आरोपींवर कठोर कारवाई
डीसीपी रणविजय सिंह म्हणाले की, जिथे अशी भीती असते, विशेषत: रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये, आम्ही तिथल्या लोकांशी वारंवार बैठका घेतो आणि त्यांना अशा गोष्टी कशा हाताळल्या पाहिजेत हे समजावून सांगतो. अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या अटींवर त्यांना ते चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्या अटींची पूर्तता केली आहे की नाही हे देखील आम्ही तपासतो. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.