गुजरात विधानसभेसाठी ‘आप’ची ‘स्वबळा’ची घोषणा; तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का?
गेल्या आठवड्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं.
अहमदाबाद: गेल्या आठवड्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याच वेळी आम आदमी पार्टीने आगामी गुजरात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का बसला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (AAP to contest on all seats in Gujarat assembly polls, says Arvind Kejriwal)
2022मध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोठं विधान केलं आहे. केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. केजरीवाल आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.
काँग्रेस भाजपमध्ये दोस्ताना
अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर केजरीवाल थेट आश्रम रोडवरील आपच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते वल्लभ सदन हवेली मंदिरात पोहोचले आणि तिथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दोन्ही पक्ष गुजरातमध्ये आपआपलं दुकान चालवत आहेत. जेव्हा जेव्हा भाजपला मदत हवी तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यांना मालाचा पुरवठा केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये 27 वर्षांपासूनचा दोस्ताना आहे. ही दोस्तीच ते निभावत आहेत. त्यामुळे जनतेचं मात्र शोषण होत आहे, असं केजरीवाल म्हणाले.
गुजरात मॉडल आम्ही दुरुस्त करू
सध्या काँग्रेस भाजपच्या खिशात आहे. गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. व्यापारी वर्ग बिथरलेला आहे. याला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. गुजरात मॉडल सध्या खराब परिस्थिती आहेत. आम्ही हे मॉडल दुरुस्त करू, असं ते म्हणाले. यापूर्वी केजरीवाल फेब्रुवारी महिन्यात सूतरला गेले होते. आपने गुजरातच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी मोठं यश मिळवलं होतं.
तिसऱ्या आघाडीला धक्का
प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. त्यात तिसरी आघाडी स्थापन होण्यावरही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही शरद पवार हे देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, असं सांगितलं होतं. मात्र, हे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच आपने एकला चलो रेची भूमिका घेतल्याने तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (AAP to contest on all seats in Gujarat assembly polls, says Arvind Kejriwal)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 14 June 2021https://t.co/AAg9xjE0VT | #MahaFastNews100 | #AjitPawar | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
संबंधित बातम्या:
बिहारमध्येही पुतण्यावर काका भारी, पासवानांच्या पक्षात फूट, कुटुंबही विस्कटलं; वाचा सविस्तर
पंजाबमध्ये बसपा-अकाली दलाच्या आघाडीचं राजकीय गणित काय?; कुणाला बसणार धक्का, वाचा सविस्तर
(AAP to contest on all seats in Gujarat assembly polls, says Arvind Kejriwal)