G20 च्या यशस्वी आयोजनानंतर PM नरेंद्र मोदी यांचे भाजप कार्यालयात जोरदार स्वागत
G20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. भाजप कार्यालयात यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : G20 शिखर परिषद यशस्वीपणे पार पडल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज भाजप कार्यालयात जोरदार स्वागत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी साडेसहा वाजता भाजप मुख्यालयात पोहोचणार आहेत. यावेळी ते निवडणूक समितीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याआधी कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत होणार आहे.
जी २० शिखर परिषद 9-10 सप्टेंबर रोजी यशस्वीपणे पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली G20 शिखर परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याआधी भारतात जी२० प्रतिनिधींच्या २०० हून अधिक बैठका पार पडल्या. भारताने केलेल्या शिखर परिषदेच्या आयोजनावर अनेक देशांनी कौतूक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सुषमा स्वराज भवन येथील G20 सचिवालयाला अचानक भेट दिली आणि शिखर परिषदेसाठी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचे आभार देखील मानले.
अमिताभ कांत आणि मुख्य समन्वयक हर्ष श्रृंगला यांच्या सोबत परराष्ट्र मंत्रालयाचे 114 अधिकारी G20 ड्युटीवर तैनात होते. जी-२० मध्ये या अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.