माँ कसम… शिवस्मारकासाठी ताजमहलपेक्षा अधिक लोक नाही आले तर नाव बदलून ठेवा; फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे. हे स्मारक ताजमहालापेक्षाही अधिक लोकप्रिय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकार या स्मारकासाठी जमीन संपादन करेल आणि स्मारक उभारेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणेच आग्र्यातही पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आग्र्यात शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधण्याची घोषणा केली. हे स्मारक अत्यंत भव्यदिव्य असेल. इतकं की ताजमहलपेक्षाही अधिक लोक शिवाजी महाराजांचं स्मारक पाहायला येतील एवढं भव्य स्मारक आग्र्यात बांधण्यात येईल, अशी घोषणाच फडणवीस यांनी केली.
आग्र्यात शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. आग्र्यात एक भव्यदिव्य स्मारक बनेल. मी योगींना प्रार्थना करतो. आम्हाला परवानगी द्या. महाराष्ट्र सरकार जमीन संपादित करेल. महाराष्ट्र सरकार आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तयार करेल. माँ कसम मी सांगतो, एकदा हे स्मारक बनलं तर ताजमहलपेक्षा अधिक लोक हे स्मारक पाहायला आले नाही तर माझं नाव बदलून ठेवा. माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही. याबाबत मी योगींशी बोलणार आहे. त्यांना निवेदन देणार आहे. तुम्हाला विनंती करतो तुम्हीही माझी बाजू मांडा. आपल्याला भव्य स्मारक बनवायचं आहे, अशी घोषणाच देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिवाजी महाराज युगपुरुष
शिवाजी महाराज स्वाभिमानाने आग्र्यात राहिले. तिथून स्वराज्यात गेले आणि हारलेले 24 किल्ले त्यांनी जिंकले. औरंगजेब काहीच करू शकला नाही. ही ताकद शिवाजी महाराजांची होती. शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते, तर ते एक युगपुरुष होते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आग्य्रातील कोठी (जी आज मीना बाजार या नावाने ओळखली जाते) जेथे छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आले होते, तेथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
औरंगजेब परत गेला नाही
औरंगाबादला आम्ही छत्रपती संभाजीनगर बनवलेलं आहे, आमचा हिरो छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगजेब हा जिंकण्यासाठी आला, मात्र त्याची कबर ही महाराष्ट्रात झाली, औरंगजेब जिवंत परत गेला नाही. औरंजेब आमचा पूर्वज नाही. तो आमचा सुपर हीरो नाही, असंही ते म्हणाले.