Air India : झाला की मेकओव्हर! Air India चा असा आहे नवीन लूक
Air India : टाटा समूहाने एअर इंडियाचे रुपडेच बदलून टाकले आहे. त्यामुळे आता या विमानाचा आतून बाहेरुन कायापालट झाला आहे. टाटा समूहाने एअर इंडियाचे रिब्रँडिग केले आहे. केवळ लोगोच नाही तर कर्मचाऱ्यांचे कपडे पण बदलण्यात आले आहे. टाटा समूहाने जागतिक स्पर्धेत एअर इंडियाने भरारी घ्यावी यासाठी अनेक बदल केले आहेत.
नवी दिल्ली | 7 ऑक्टोबर 2023 : टाटा सन्सच्या (Tata Sons) ताफ्यात आल्यापासून एअर इंडियाने कात टाकली आहे. एअर इंडियाचा लूक (Air India Look) एकदम झक्कास झाला आहे. या एअरलाईनने आता विमानाची पहिली झलक समाज माध्यमांवर शेअर केली आहे. त्यावर लाईक्स आणि कमंटेचा पाऊस पडला आहे. एअरलाईनने ए350 विमानाचं ताजं छायचित्र शेअर केलं आहे. हे विमान फ्रान्सच्या Toulouse च्या रंगशाळेत (Paint House) उभं आहे. तिथल्या कारागिरांनी त्याला नावीन्यतेच्या रंगात न्हाऊन टाकलं आहे. ए्अर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हे छायाचित्र शेअर केले आहे. नवीन रंगात न्हाऊन निघालेली ही विमानं हिवाळ्यात भारतात दाखल होतील.
महाराजा बदलला
यापूर्वीच नवीन लोगोच्या रंगात एअरलाईन्सचा शुभंकर महाराजा न्हाऊन निघाला आहे. आधुनिक रुप, स्टाईलिश डिझाईन, लाल, पांढरा आणि नारंगी रंगाच्या सरमिसळीने हा नवा लोगो डोळ्याचे पारणे फेडतो. हा लोगो अपिल झाला आहे. तो मनाला भुरळ घालतो.
एअर इंडियाची बदलली शैली
एअर इंडिया तिची शैली बदलत आहे. एअर इंडियाने नुकताच लोगोमध्ये बदल केला आहे. या लोगोचे नाव दि विस्टा असे ठेवण्यात आले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या गणवेश पण बदलला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी हा गणवेश तयार केला आहे. त्यासाठी त्यांच्यासोबत करार करण्यात आला होता. एअर इंडियाच्या 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलण्याची योजना आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये वैमानिक, विमानातील कर्मचारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतरांचा समावेश आहे.
Here’s the first look of the majestic A350 in our new livery at the paint shop in Toulouse. Our A350s start coming home this winter… @Airbus #FlyAI #AirIndia #NewFleet #Airbus350 pic.twitter.com/nGe3hIExsx
— Air India (@airindia) October 6, 2023
दिल्लीत भांडार
एअर इंडियाने विमानाची डागडूज आणि देखभालीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी भांडार उघडले आहे. यामध्ये 10 लाखांहून अधिक छोटे-मोठे सामान असेल. दिल्ली विमान तळावरील टर्मिनल-3 जवळ जवळपास 54,000 चौरस मीटरवर विमाना संबंधीत सर्व साहित्याचं भांडार असेल. त्यामुळे अनेक मोठं-मोठ्या दुरुस्तीसाठी विमान हलविण्याची गरज पडणार नाही. याठिकाणी सर्वच यंत्रणा तैनात ठेवण्यात येईल.
गेल्या वर्षी केली खरेदी
एअर इंडियाची टाटा सन्सने जानेवारी 2022 मध्ये खरेदी केली. सहायक कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यात आले. एअर इंडिया आणि टाटा सन्सची आणखी एक सहायक कंपनी विलिनीकरण करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. हे विलिनीकरण मार्च 2024 पर्यंत करण्यात येईल, असा अंदाज आहे.