ही तर भाजपची लस, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? : अखिलेश यादव
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवरुन भाजपवर टीका करताना कोरोना लसीच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला.
लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवरुन भाजपवर टीका करताना कोरोना लसीच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केला. ही भाजपची लस आहे. तिच्यावर मी विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न अखिलेश यादव यांनी केला. तसेच आम्ही भाजपची कोरोना लस घेऊ शकणार नाही. लवकरच आमचं सरकार येईल आणि तेव्हा आम्ही सर्वांना मोफत लस देऊ, असं आश्वासनही यावेळी अखिलेश यांनी दिलं (Akhilesh Yadav criticize BJP over Corona Vaccine raise question).
अखिलेश यादव म्हणाले, “मी सध्या तरी कोरोना लस घेणार नाहीये. भाजपच्या कोरोना लसीवर मी विश्वास कसा ठेवावा? आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांसाठी मोफत कोरोना लस देऊ. आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही.”
I am not going to get vaccinated for now. How can I trust BJP’s vaccine, when our government will be formed everyone will get free vaccine. We cannot take BJP’s vaccine: Samajwadi Party chief Akhilesh Yadav#COVID19 pic.twitter.com/qnmGENzUBH
— ANI UP (@ANINewsUP) January 2, 2021
यावेळी अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. समाजवादी पक्षाचं सरकार आल्यानंतर अयोध्येतील नगर पालिका कर रद्द केला जाईल, असं आश्वासनही दिलं. त्यांनी शनिवारी (2 जानेवारी) अयोध्यात जाऊन सर्व धर्मगुरुंची भेट घेत आशिर्वादही घेतले आहेत.
‘नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनात शेतकऱ्यांचं बलिदान’
अखिलेश यादव यांनी शेतकरी आंदोलनावरुनही मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आंदोलनात गाझीपूर सीमेवर एका शेतकऱ्याच्या बलिदानाची बातमी सुन्न करणारी आहे. कडकडीत थंडीत शेतकरी आपल्या जीवाचं बलिदान करत आहेत. मात्र, सत्ताधारी निर्दयी होऊन बसले आहेत. भाजपसारखा सत्तेचा अहंकार आणि निर्दयीपणा आतापर्यंत कोणतही पाहिला नाही.”
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि केशव मौर्या यांच्याकडून पलटवार
अखिलेश यादव यांच्या कोरोनावरील वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी जीव वाचला तर सर्व काही करता येईल असं म्हटलंय. कोरोना लसीसाठी जगभरातील संशोधकांनी रात्रंदिवस एक करुन काम केलंय. अखिलेश यादव आपल्या राजकारणाचं बुडतं जहाज वाचवण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत.”
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य म्हणाले, “अखिलेश यादव यांना कोरोना लसीवर विश्वास नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला अखिलेश यादव यांच्यावर विश्वास नाही. लसीवर प्रश्न उपस्थित करणे हा त्या संशोधकांचा अपमान आहे. यासाठी त्यांनी माफी मागायला हवी.”
हेही वाचा :
मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव
सपासोबत जाऊन काहीही फायदा झाला नाही : मायावती
BSPचे 7 बंडखोर आमदार निलंबित, सपाला हरवण्यासाठी भाजपलाही मतदान करणार – मायावती
Akhilesh Yadav criticize BJP over Corona Vaccine raise question