Amit Shah : तहव्वुर हुसैन राणाने भारतात पाऊल ठेवण्याआधीच अमित शाह यांचं मोठं वक्तव्य
Amit Shah : 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसैन राणाला अमेरिकेतून भारतात आणलं जातय. त्याने भारतात पाऊल ठेवण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यातून भारतात आल्यानंतर तहव्वुर हुसैन राणासोबत काय होणार ते स्पष्ट होतं.

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसैन राणाला अमेरिकेतून भारतात आणलं जातय. तहव्वुर हुसैन राणाला आज आणलं जाईल. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणाची प्रत्यर्पण रद्द करण्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्याला भारतात आणण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली. तहव्वुर हुसैन राणाने भारतात पाऊल ठेवण्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. “ज्यांनी भारताचा सन्मान, भूमी आणि लोकांवर हल्ला केला, त्यांना शासन झालं पाहिजे. तहव्वुर हुसैन राणाच प्रत्यर्पण हे त्याचाच एक भाग आहे” असं अमित शाह म्हणाले.
“तहव्वुर हुसैन राणाच प्रत्यपर्ण हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटनितीचा मोठा विजय आहे” असं अमित शाह एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. भारताचा सन्मान, भूमी आणि लोकांवर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा व्हावी हा मोदी सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. “तहव्वुर हुसैन राणाला इथे आणून त्याच्याविरोधात खटला चालवून त्याला शिक्षा होईल. मोदी सरकारच हे मोठं यश आहे” असं अमित शाह म्हणाले. त्यांनी थेट काँग्रेसच नाव न घेता टोमणा मारला.
आजवरचा मुंबईवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
“मुंबईवर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी राणाला भारतात आणून खटला चालवला नाही” असं अमित शाह म्हणाले. तहव्वुर हुसैन राणा हा मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा जवळचा मित्र आहे. राणाने मुंबईत येऊन रेकी केली होती. म्हणजे जिथे हल्ला करायचा, त्या ठिकाणांची पाहणी केली होती. 26/11 चा हल्ला हा आजवरचा मुंबईवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईच्या विविध भागात जाऊन बेछूट गोळीबार, बॉम्बस्फोट केले होते. त्यामुळे अनेक निष्पाप नागरिक आपल्या प्राणाला मुकले होते.