अमेठीत होणार रंजक लढत, स्मृती इराणी यांच्याविरोधात राहुल गांधी नाही तर….?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण उमेदवारी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जागांवर अद्याप उमेदवार जाहीर न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Amethi loksabha : लोकसभा निवडणुकीच्या आधी अमेठीतून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अजूनही कायम आहे. राहुल गांधी येथून निवडणूक लढवणार की नाही याबाबत अजूनही काहीही ठरलेलं नाही. त्यामुळे प्रियांका गांधी येथून निवडणूक लढवणार अशी शक्यता असतानाच आता आणखी एक नाव पुढे आले आहे. यूपीमध्ये काँग्रेस आणि सपा या दोन पक्षांमध्ये युती आहे, मात्र अद्यापपर्यंत या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत. या चर्चेदरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांचे एक विधान समोर आले आहे. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना पक्ष येथून उमेदवारी देऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागा गांधी परिवारासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा?
रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, अमेठीचे लोक खूप नाराज आहेत. लोक म्हणतात की त्यांनी चूक केली. अमेठीच्या जनतेची इच्छा आहे की मी तिथून निवडणूक लढवावी. मी राजकारणात पहिले पाऊल टाकले तर ते तिथूनच असावे, अशी अमेठीतील जनतेची इच्छा आहे. मला खासदार व्हायचे असेल तर अमेठीला माझा मतदारसंघ बनवावा. या दरम्यान रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत अमेठीमध्ये प्रचारासाठी गेलेल्या ९९ वर्षांचा उल्लेख केला. रॉबर्ट वड्रा यांनी विद्यमान खासदार स्मृती इराणींवरही निशाणा साधला.
रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, अमेठीतील लोकांना वाटते की त्यांच्याकडून चूक झाली आहे. सध्याचे खासदार तिथे फारसे फिरकत नाहीत. खासदार अमेठीच्या प्रगतीचा विचार करत नाहीत, त्यांचे संपूर्ण लक्ष गांधी घराण्याला दोष देण्यावर असते. आवाज कसा काढायचा यावर जास्त भर असतो. मी पाहतो की ती बहुतेक यात गुंतलेल्या असतात. गांधी परिवाराने वर्षानुवर्षे रायबरेली-अमेठीची सेवा केली आहे.
अमेठीच्या जनतेला वाटते की, गांधी घराण्यातील कोणीतरी तिथून यावे. 1999 मध्ये मी प्रियंकासोबत अमेठीतूनच प्रचार केला होता. कार्यकर्त्यांसोबत रात्रंदिवस मेहनत घेतली. बंधुभाव आणि प्रेम आहे हे त्यांना माहीत आहे. मी ज्यांच्यासोबत काम केले ते आजही माझ्या वाढदिवसाला केक कापतात आणि लंगर देतात. त्यांना माहित आहे की मला तेच आवडते. मला देशसेवा करायला आणि समाजासाठी काहीतरी करायला आवडते.
Delhi | On UP’s Amethi Lok Sabha constituency, Robert Vadra says, “…The people of Amethi expect me to represent their constituency if I decide to become a member of Parliament…For years, the Gandhi family worked hard in Rae Bareli, Amethi and Sultanpur…The people of Amethi… pic.twitter.com/2kdmgQtrvv
— ANI (@ANI) April 4, 2024
राहुल गांधी वायनाडमधून लढणार
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2014 मध्ये अमेठीमधून निवडणूक जिंकली होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला होता. 2019 मध्ये त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. केरळमधील वायनाडची जागा त्यांनी जिंकली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी वायनाडमधून उमेदवारीही दाखल केली आहे. रॉबर्ट वाड्रा अमेठीतून निवडणूक लढल्यास या जागेवर पुन्हा एकदा रंजक लढत पाहायला मिळणार आहे.