असंही एक अनोखं गाव, जिथे गांधीजींची होते मनोभावे पूजा !
खरीप हंगाम सुरू करण्यापूर्वी गांधीजी यांची पूजा करतात. कुठे आहे हे गाव, जाणून घेऊया..
श्रीकाकुलम | 26 जुलै 2023 : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे देशाचे ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जातात. मात्र भारतात असंही एक गाव आहे जिथे गांधीजींची पूजा केली जाते. आंध्र प्रदेशातील केदारीपुरम गावातील स्थानिक गेल्या अनेक दशकांपासून गांधीजींची मनोभावे पूजा (worshiped) करत आहेत.
एका रिपोर्टनुसार, गावकरी खरीप हंगाम सुरू करण्यापूर्वी गांधीजी यांची पूजा करतात. त्यानिमित्त ते गंधम्मा संबारम नावाचा सण साजरा करतात. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांचे पूर्वज हा सण साजरा करत आहेत, असे श्रीकाकुलम येथील केदारीपुरम गावातील वृद्ध नागरिकांनी सांगितले.
पण काही लोकं असं मानतात की ही प्रथा इनामदारी पद्धतीच्या काळापासून चालत आली आहे. जेव्हा दोन व्यक्तींनी तत्कालीन शासनकर्त्यांकडून भेट म्हणून 250 एकर जमीन घेतली होती. आणि शेतकऱ्यांना त्यांची जमीन कसायला लावली होती, तेव्हापासून हे सुरू असल्याचे त्यांचे मत आहे.
‘ आमच्या पूर्वजांनी गांधीजींकडून प्रेरणा घेऊन सत्याग्रह केला आणि ती जमीन मुक्त केली. (त्यानंतर) गावागावांत एक गांधी युवा संघ आणि अनुदानित शाळा बांधण्यात आली ‘ असे फाल्गुन राव (वय 65) या केदारीपुरमच्या सरपंचांनी सांगितले.
‘ गावातील इनामदारांविरोधात आपली एकजूट दाखवण्यासाठी गावकरी (बक्षीस म्हणून मिळालेल्या) शेतात, शेतीच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी उत्सवाचे आयोजन करायचे. उत्तर किनारपट्टीवरील गावकरी साधारणत: शेतीच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी देव-देवतांची पूजा करतात. आम्ही गांधीजींना मानतो. त्यांच्या आशिर्वादाने आम्हाला भरपूर उत्पन्न मिळते. त्यामुळे आम्ही या सणाचे नाव गंधम्मा संबारम असे ठेवले ‘ असे राव यांनी नमूद केले. या पूजेच्या विधीचा भाग म्हणून गावकरी फळे आणि प्रसाद चढवतात. या निमित्त भजनही गायले जाते.