शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये, अशोक चव्हाणांनी राऊतांना फटकारलं
शिवसेना हा पक्ष UPA मध्ये सहभागी नाही. त्यामुळे त्यांनी UPAच्या नेतृत्वाबाबत सल्ला देऊ नये, असा टोला अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
मुंबई: संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA च्या अध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर द्यायची यावरुन आता देशात आणि महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. UPAचं अध्यक्षपद काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याची मागणी केली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी तशी इच्छा बोलून दाखवली आहे. इतकच नाही तर सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी UPA अध्यक्षपदावरुन काँग्रेसवर टीकाही केलीय. त्या टीकेला काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. (Ashok Chavan criticizes Sanjay Raut on UPA president)
शिवसेना हा पक्ष UPA मध्ये सहभागी नाही. त्यामुळे त्यांनी UPAच्या नेतृत्वाबाबत सल्ला देऊ नये, असा टोला अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. महाराष्ट्रात फक्त किमान समान कार्यक्रमावरुनच शिवसेनेला पाठींबा दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी काँग्रेस पक्षाबाबत भाष्य करु नये, असा इशाराच चव्हाण यांनी शिवसेनेला दिला आहे. तसंच कृषी कायद्याबाबात सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी आपली बाजू मांडली आहे, असंही चव्हाण म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
देशात भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. भाजपची तानाशाही सुरु आहे. या तानाशाहीविरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यायला हवं”, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. देशात विरोधी पक्षाची दुर्दशा झाल्याचं म्हणत त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवरही निशाणा साधला.
पवारांच्या अध्यक्षपदाला काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा!
महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो करिश्मा शरद पवारांनी केला तोच करिश्मा देशपातळीवर पवारांनी करावा, याचाच भाग म्हणून पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. मात्र या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्ट करत पवारांनी चर्चेतील हवा काढून घेतली. आता काँग्रेसचे दिग्गज नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांच्या यूपीए अध्यक्षपदापदासाठी पाठिंबा दिलाय.
“शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आजचा सोहळा म्हणजे सहस्त्रचंद्रदर्शनाचा हा सोहळा आहे. त्यांनी 50 वर्षांत अनेक चढ उतार बघितले. त्यांनी अनेक व्यक्तींसोबत काम केलं. त्यांचा अनुभव मोठा आहे. शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल”, असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय.
राहुल गांधींविरोधात षडयंत्र?
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शुक्रवारी ट्विट करत पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चेपाठीमागे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा”, असं खळबळ उडवून देणारं ट्विट निरुपम यांनी केलं आहे. याच अभियानाच्या अंतर्गत 23 सह्यांचं पत्र लिहिलं गेलं होतं, असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
संबंधित बातम्या:
UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?
पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा!
Ashok Chavan criticizes Sanjay Raut on UPA president