कलमा म्हटल्याने वाचला जीव; प्राध्यापकाने सांगितला पहलगाममधील थरकाप उडवणारा अनुभव
आसाममधील प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जीव कलमा म्हटल्याने वाचल्याचं त्यांनी सांगितलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातून ते सुखरुप बचावले. त्यावेळचा प्रसंग त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.

काश्मीरमधील पहलगामच्या बैसनर खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळी केला. काही पर्यटकांना धर्म विचारून त्यांना लक्ष्य केलं गेलं. या गोळीबारात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यात आसाममधील एका प्राध्यापकांचा जीव थोडक्यात बचावला. आसाम विद्यापिठाचे असोसिएट प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत पहलगामला फिरायला गेले होते. दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा ते पत्नी आणि मुलासोबत तिथेच होते. अशा वेळी युक्ती लढवून त्यांनी आपला आणि कुटुंबीयांचा जीव वाचवला.
“आम्ही एका झाडाखाली होतो तेव्हा काही लोकांना कलमा म्हणताना ऐकलं. मी लगेचच त्यांच्यासोबत जाऊन बसलो. तितक्यात एक दहशतवादी माझ्याजवळ आला आणि मला पाहून विचारलं, तू हे काय करतोय? मी घाबरून जोरजोरात कलमा म्हणू लागलो. तेव्हा परत त्याने विचारलं, तू काय म्हणतोय? मी फक्त.. ला इलाहा इलाल्लाह.. असं म्हणू लागलो. काही कारणास्तव तो तिथून निघून गेला. त्यांनी मला थेट कलमा म्हणण्यास सांगितलं नव्हतं. पण इतरांना तसं करताना पाहून मीसुद्धा त्यांच्यासोबत बसलो. पण एक व्यक्ती दुसऱ्यांना विचारताना मी ऐकलं होतं की कोणी राम नाम म्हणत असेल तर लक्ष ठेव”, असं भट्टाचार्य म्हणाले.




दहशतवादी तिथून निघून गेल्यानंतर पत्नी आणि मुलाला घेऊन भट्टाचार्य सुरक्षित ठिकाणी पळाले. जवळपास दोन तास चालल्यानंतर त्यांना एक स्थानिक व्यक्ती दिसला. त्याला विचारून ते पहलगामपर्यंत पोहोचले. देबाशिष आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित आसामला आणण्यासाठी आसाम सरकारने व्यवस्था केली आहे. “संपूर्ण कुटुंबाला राज्यात परत आणण्याची व्यवस्था प्राधान्यक्रमाने केली जात आहे. कुटुंबाला लवकरात लवकर आसाममध्ये परत आणण्यासाठी आसाम सरकार हे भारत सरकारच्या संपर्कात आहे”, असं आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केलंय. काही प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला की दहशतवादी हे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून लक्ष्य करत होते. प्राध्यापक भट्टाचार्य आणि त्यांचे कुटुंबीय सध्या सुरक्षित असून ते 26 एप्रिल रोजी श्रीनगरला परतणार असल्याचं कळतंय.