अजब रेल्वे स्टेशन, येथे लोक तिकीट काढतात पण प्रवास करीत नाहीत
भारतीय रेल्वेवरील या अनोख्या स्थानकात प्रवासी दररोज येतात तिकीटही खरेदी करतात. परंतू प्रवास करतील याची काही हमी देता येत नाही.
नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : रेल्वे स्थानक म्हटले की प्रवाशांनी खच्चून भरलेले स्टेशन, तिकीट खिडक्यांवर भल्यामोठ्या रांगा, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची गर्दी असं चित्र डोळ्यासमोर उभं रहातं. परंतू देशात एक असेही रेल्वे स्थानक आहे. तेथे निराळंच चित्रं पाहायला मिळतं. या भारतीय रेल्वेच्या अनोख्या रेल्वे स्थानकात प्रवासी तिकीट तर खरेदी करतात, परंतू प्रवास करीत नाहीत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल. परंतू हे सत्य आहे. तुम्हाला वाटत असेल असे का करीत असतील लोक ? कुठे आहे असे अनोखे स्टेशन चला पाहूयात
भारतीय रेल्वेवरील या अनोख्या स्थानकात प्रवासी दररोज येतात तिकीटही खरेदी करतात. परंतू प्रवास करतील याची काही हमी देता येत नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अनोख्या स्थानकाचे नाव दयालपूर रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाची मुहूर्तमेढ साल 1954 मध्ये रोवली गेली होती. या स्थानकाच्या निर्मितीमध्ये देशाचे पहीले पंतप्रधान पंडीत नेहरु यांचा योगदान होते.
साल 2006 मध्ये स्थानकाला बंद केले
1954 साली दयालपूर स्थानक बांधण्यात आले. रेल्वेस्थानकामुळे नागरिकांची सोय झाली. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचला. पन्नास वर्षे या स्थानकातून सुरळीत गाड्यांची प्रवासी वाहतूक सुरु होती. नंतर साल 2006 मध्ये या स्थानकाला बंद करण्यात आले. या स्थानकातून फारच कमी तिकीट खरेदी होत असल्याने त्यामुळे रेल्वेला स्थानक चालविण्यात स्वारस्य न वाटल्याने ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोक तिकीट खरेदी यासाठी करतात?
साल 2020 दयालपुर रेल्वे स्थानकाला पुन्हा सुरु केले गेले. स्थानिक जनता हे स्थानक पुन्हा बंद होऊ नये यासाठी तेथे तिकीट खरेदी करु लागली. परंतू ट्रेनचा प्रवास करीत नाहीत. स्थानिक लोक या स्थानकाला रोज भेट द्यायला येतात. तिकीट खरेदी करुन ते बंद होऊ नये याची काळजी घेतात. दयालपूर स्थानकात जादा गाड्यांना थांबाही नाही. परंतू ज्या काही मोजक्या गाड्यांना थांबा आहे, त्यातून तुरळक लोक प्रवास करीत असतात.