औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक – RSS
"पंतप्रधानांचा कालचा कार्यक्रम चांगला झाला. सेवेसंदर्भात त्यांची रुची कोरोना काळात पाहिली. त्यांनी कोरोना काळात ऊर्जा प्रदान करण्याच काम केलं. माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले, लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल" असं भय्याजी जोशी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नागपूर दौऱ्यावर होते. त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे माधव नेत्रालय सेंटरच्या विस्ताराचा शिलान्यास करण्यात आला. यावेळी त्यांनी संघाच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज 100 वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हा साधारण वटवृक्ष नाही. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी मोदींच्या या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“पंतप्रधानांचा कालचा कार्यक्रम चांगला झाला. सेवेसंदर्भात त्यांची रुची कोरोना काळात पाहिली. त्यांनी कोरोना काळात ऊर्जा प्रदान करण्याच काम केलं. माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले, लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल” असं भय्याजी जोशी म्हणाले.
‘औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक’
संघाच्या उत्तर अधिकाऱ्याच्या विषयावर, ते परंपरेनुसार होईल, असं ते म्हणाले. पीएम मोदींच्या उत्तराधिकाऱ्याच्या विषयावर याबद्दल मला माहित नाही, असं सांगितलं. “औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू इथे झाला, त्याची कबर बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाची कबर बनवली. भारताच्या उदारतेच आणि सर्व समावेशकतेचे हे प्रतीक आहे, कबर राहो ज्याला जायचा आहे तो जाईल” असं भय्याजी जोशी म्हणाले.