प्रतीक्षा संपणार, रामभक्तांसाठी मोठी बातमी, मकरसंक्रांतीचा मुहूर्त, लक्ष अयोध्येकडे!
उत्तर प्रदेशामधील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम टप्प्या-टप्प्याने पूर्ण केले जात आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
लखनौः उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्येत (Ayodhya) राम मंदिराचे बांधकाम वेगाने आणि अत्यंत शिस्तबद्ध सुरु आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता व्यकत केली जात आहे. मात्र रामलल्लांची (Ramlalla) मूर्ती या ठिकाणी कधी स्थापली जाईल, याकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष लागलं आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या विषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. 2024 या वर्षातील जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीदरम्यान रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी 1800 कोटी रुपये खर्च होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मंदिर पूर्ण झाल्यावर लाखोंच्या संख्येने लोक अयोध्येत येतील. या दृष्टीनेही प्रशासनाच्या वतीने आतापासूनच तयारी सुरु आहे.
अयोध्येत प्रवासी आणि पर्यटकांसाठी एअरपोर्ट बांधले जात आहे. इथले रेल्वे स्टेशनदेखील अति भव्य बांधले जात आहे.
अयोध्येत रेल्वेचं जाळं मजबूत करण्यासाठी दुहेरीकरणाचं काम सुरु आहे. हा प्रकल्पही युद्ध पातळीवर पूर्ण केला जात आहे.
शहरात 6 पार्किंग बनवले जात आहेत. येथे कार उभ्या करून भाविक इलेक्ट्रिक वाहनातून अयोध्येत प्रवेश करतील.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राम मंदिर बांधकामासाठी एक ट्रस्ट स्थापन कऱण्यात आली आहे. या ट्रस्टने एक बैठक घेतली. यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
ट्रस्टचे महासचिव चंपत राय म्हणाले, फैजाबाद सर्किट हाऊसमध्ये ही बैठक झाली. राम जन्मभूमी परिसरात हिंदू धर्माशी संबंधित महान व्यक्ती आणि साधू संतांच्या प्रतिमांनाही स्थान दिले जाईल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
याअंतर्गत महर्षी वाल्मिकी, वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, जयाटू यांच्यासह शबरी मातेचं मंदिरदेखील स्थापन केलं जाईल. सर्वानुमते ही मंदिरं स्थापन करण्याचा निर्णय झाला.
70 एकर परिसरात अतिरिक्त 7 मंदिरं बांधली जातील. रामायणातील महत्त्वाच्या व्यक्तींची ही मंदिरं असतील. त्यांचे स्थानही निश्चित करण्यात आले आहे.
तसेच ट्रस्टशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काही अंतर्गत व्यवस्थापनासाठीचे नियमही निश्चित करण्यात आले.