Bhagat Singh Koshyari : इथं मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला, मी काहीही बोलणार नाही; भगत सिंग कोश्यारींचा माध्यमांशी बोलण्यास नकार!
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देश साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हर घर तिरंगा हादेखील एक उपक्रम आहे. याचे उद्घाटन भगत सिंग कोश्यारींच्या हस्ते महाराष्ट्र सदनात करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
नवी दिल्ली : येथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोलावे. काहीही बोलणार नाही. राज्यपालांना बोलण्याचे आदेश नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी दिली आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये हर घर तिरंगा मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भगत सिंग कोश्यारी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील (Eknath Shinde) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन याठिकाणी झाले. त्यावेळी टीव्ही 9ने त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. राज्यपालांना बोलण्याचा आदेश नाही, असे सांगत ते आपल्या गाडीकडे निघून गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या राज्यपालांना न बोलण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली.
सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये
महाराष्ट्रातून, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढले तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळखही उरणार नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी नुकतेच केले होते. विविध स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. शेवटी आपल्या वक्तव्याची सारसासारव त्यांना करावी लागली. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही राज्यपाल म्हणाले आहेत. त्याआधी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयीदेखील वाद निर्माण करणारे वक्तव्य त्यांनी केले होते. तर त्यांच्या भाजपाधार्जिण्या भूमिकांमुळेही ते सतत वादात सापडत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर आता ते माध्यमांशी बोलणे टाळताना दिसून येत आहेत.
काय म्हणाले राज्यपाल?
हर घर तिरंगा मोहीम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देश साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत देशभरात 9 ऑगस्टपासून आठवडाभर ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज फडकावा आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळकटी द्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या उपक्रमाचे दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. मात्र यावेळी राज्यपालांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.