Karnataka : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना मोठा झटका, भाजपने कापले मुलाचे तिकीट
याच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवारी काँग्रेसने एम नागराजू यादव आणि के. अब्दुल जब्बार यांच्या नावाची घोषणा केली होती. ते काँग्रेचे उमेदवार असतील. विधान परिषदेच्या या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले आमदार 3 जून रोजी मतदान करणार आहेत.
बंगळुरु : देशातील काही राज्यांच्या निवडणूका पार पडल्या त्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. दरम्यान कर्नाटकातही विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणूका होणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे सध्या कर्नाटकात 3 जून रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. भाजपकडून (Bharatiya Janata Party)आज मंगळवारी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. तर काँग्रेसकडूनही आपली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांचा समावेश आहे. मात्र पक्षाने त्यांच्या मुलाच्या नावावर अजून विचार केल्याचे दिसत नाही. तर बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र, हे सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्या नावावर पक्षाने फुली मारल्याचेच दिसत असून त्यांना एमएलसीचे तिकीट (MLC Election)नाकारण्यात आले आहे.
कर्नाटक विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी भाजपने आपल्या 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. चालुवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस केशवप्रसाद आणि लक्ष्मण सवदी यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आली आहेत. तर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना तिकीट मिळालेले नाही. याशिवाय बसवराज होरत्ती यांनाही तिकीट देण्यात आले आहे.
Bharatiya Janata Party announces candidates for biennial elections to Legislative Council from Karnataka pic.twitter.com/CqIWvFhO56
— ANI (@ANI) May 24, 2022
काँग्रेसने उमेदवार जाहीर केले
याच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवारी काँग्रेसने एम नागराजू यादव आणि के. अब्दुल जब्बार यांच्या नावाची घोषणा केली होती. ते काँग्रेचे उमेदवार असतील. विधान परिषदेच्या या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले आमदार 3 जून रोजी मतदान करणार आहेत. तर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज मंगळवार शेवटचा दिवस आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नागराजू यादव आणि जब्बार यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यादव हे बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC)चे अध्यक्ष आहेत. तर जब्बार सध्या कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) च्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहीले आहेत. 7 सदस्यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात 14 जून रोजी संपत असल्याने या निवडणुका होत आहेत. भाजपचे लक्ष्मण संगप्पा सवदी आणि लहारसिंग सिरोया, काँग्रेसचे रामाप्पा तिम्मापूर, अल्लुम वीरभद्रप्पा, वीणा अचय्या एस. आणि जद (सेक्युलर) एचएम रमेश गौडा आणि नारायण स्वामी के.व्ही. यांचा कार्यकाळ संपल्यामुळे विधानपरिषदेच्या या 7 जागांवर निवडणूका होत आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी 29 मतांची गरज
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत प्रत्येक विधानपरिषदेत आमदारकी लढणाऱ्या उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान 29 मतांची आवश्यकता असेल. जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान मतांची संख्या आणि विधानसभेतील प्रत्येक पक्षाच्या आमदारांच्या संख्येवर आधारित भाजपला चार जागा, काँग्रेसला दोन आणि JD(S)ला एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसमध्ये यावेळी आमदारकी मिळावी यासाठी अनेक दावेदार होते. दोन्ही जागांसाठी 200 हून अधिक दावेदार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले होते. 3 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.