Bihar Election Result : बिहारमधील मंत्री आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोण आघाडीवर-कोण मागे?
बिहारमधील हाय प्रोफाईल मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रमुख नेते यांची स्थिती काय आहे याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या निवडणुकीत अनेक मंत्री आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Bihar Election Result 2020) वारंवार मोठे बदल होताना दिसत आहे. कधी कोण पुढे जातंय, तर कधी कोण मागे पडत आहे. त्यातच बिहारमधील हाय प्रोफाईल मंत्री आणि राजकीय पक्षांचे प्रमुख नेते यांची स्थिती काय आहे याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या निवडणुकीत अनेक मंत्री आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांच्यापासून अनेकांचा समावेश आहे. या सर्वांच्या स्थितीचा हा आढावा (Bihar Election Result 2020 of High Profile seats of Big leader and Ministers of Bihar).
तेजस्वी यादव
वैशाली जिल्ह्यातील राघोपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या तेजस्वी यादव यांच्याविरोधात भाजपकडून सतीश कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी तेजस्वी यादव जवळपास 7 हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे तेजस्वी यादव यांचे बंधु तेजप्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर मतदारसंघातून उभे आहेत. त्यांनी जेडीयूच्या उमेदवाराला मागे टाकत 5 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
मुकेश सहनी
समस्तीपूर जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर मतदारसंघातून एनडीएचा मित्रपक्ष विकासशील इंसान पार्टीचे (वीआईपी) मुकेश सहनी 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. सहनी यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात असलेले आरजेडीचे यूसुफ सलाऊद्दीन मागे पडले आहेत.
नंद किशोर यादव
पटना साहिब येथून भाजपचे दिग्गज नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले नंदकिशोर निवडणूक लढत आहेत. ते काँग्रेसचे उमेदवार प्रवीण सिंह यांच्यापेक्षा 7 हजार मतांनी पुढे आहेत.
विजय कुमार चौधरी
बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी समस्तीपूर जिल्ह्यातील सरायरंजन जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यात आणि आरजेडीचे उमेदवार अरविंद कुमार सहनी यांच्यात कडवी लढत सुरु आहे. विजय कुमार चौधरी सध्या केवळ 360 मतांनी अरविंद कुमार यांच्यापुढे आहेत.
लव सिन्हा
अभिनेते ते राजकीय नेते असा प्रवास करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा पाटणाच्या बांकीपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. लव सिन्हा भाजप उमेदवार नितीन नवीन यांच्यापेक्षा जवळपास 11 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. याच जागेवरुन परदेशातून बिहारमध्ये येऊन निवडणूक लढवणाऱ्या प्लूरल्स पक्षाच्या प्रमुख पुष्पम प्रिया चौधरी देखील मागे पडल्या आहेत.
श्रेयसी सिंह
माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह जमुई येथून भाजपच्या तिकिटावर उभ्या आहेत. येथून श्रेयसी सिंह आरजेडीचे उमेदवार विजय प्रकाश यांच्यापेक्षा 22 हजार 271 मतांनी पुढे आहेत.
जीतन राम मांझी
माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतराम मांझी इमामगंज मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात आरजेडीचे उदय नारायण चौधरी हे आहेत. या ठिकाणी मांझी यांनी 6 हजार 125 मतांची आघाडी घेतली आहे.
प्रेम कुमार
बिहार सरकारमध्ये मंत्री आणि भाजपचे नेते प्रेम कुमार गया शहरातून उभे आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अखौरी ओंकार नाथ मैदानात आहेत. या ठिकाणी प्रेम कुमार 5 हजार मतांच्या आघाडीवर आहेत.
चंद्रिका राय
परसा मतदारसंघातून तेज प्रताप यादव यांचे सासरे आणि लालू यादव यांचे साडू चंद्रिका राय पिछाडीवर आहेत. या ठिकाणी आरजेडीचे छोटेलाल यादव 11 हजार 308 मतांनी आघाडीवर आहेत.
संबंधित बातम्या :
संबंधित व्हिडीओ :
Bihar Election Result 2020 of High Profile seats of Big leader and Ministers of Bihar