नातीला खेळवत असतानाच भुंग्याचा हल्ला, हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा तडफडत मृत्यू; एकच खळबळ
हवाई दलातील अधिकारी रणजीत कुमार चंदिगडमध्ये तैनात होते. दोनच दिवसांपूर्वी ते मुझफ्फरपूर येथील त्यांच्या घरी सुट्टीसाठी आले होते. तो नातीसोबत घराबाहेर बसले होते. तेव्हा भुंग्याच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चावण्यामुळे ते गंभीर जखमी झाले. यामुळेच त्यांना जीवही गमवावा लागला.
पाटणा | 10 जानेवारी 2024 : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात भुंग्यांनी चावा घेतल्याने हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रणजीत कुमार असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते हवाई दलात कार्यरत होते. ते दोन दिवसांपूर्वीच रजेवर घरी आले होते. चंदिगडमध्ये हवाई दलात मास्टर वॉरंट ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या ते अहियापूर येथील द्रोणपूर येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी सुट्टीवर होते. मात्र भुंग्यांच्या चाव्याने त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय, आजूबाजूचे लोक मध्ये हळहळ व्यक्त करत आहेत.
त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे घरच्यांची, कुटुंबियांची रडून-रडून वाईट अवस्था झाली आहे. मृत हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एसकेएमसीएचमध्ये आणण्यात आला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, एअरफोर्समध्ये कार्यरत असलेले अधिकारी रणजीत कुमार हे सुट्टीसाठी आले होते. द्रोणपूर गावातील त्यांच्या घराबाहेर ते बसले होते. त्यांची नातवंड घराबाहेरच खेळत होती. मात्र अचानक, भुंग्याच्या थव्याने रणजीत यांच्यावर हल्ला केला. संपूर्ण अंगावर तो चावू लागला. रणजीत यांनी त्यांच्या नातवंडाना कसेबसे घरात नेले. मात्रप तोपर्यंत भुंग्याच्या चाव्यामुळे त्यांचा चेहरा, हात, पाय आणि शरीराचे इतर उघडे भाग चावून, प्रचंड जखमी झाले होते. वेदनेमुळे ते मोठमोठ्याने औरडू लागले आणि थोड्याचे वेळात बेशुद्ध होऊन धाडकन खाली कोसळले.
तातडीने रुग्णालयात नेले पण
जखमी रणजीत यांना कुटुंबीयांनी तातडीने श्रीकृष्ण मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती एसकेएमसीएच ओपीचे प्रभारी आदित्य कुमार यांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी एसकेएमसीएचमध्ये पाठवला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
भुंग्यांच्या थव्यामुळे लोकांमध्ये दहशत
या घटनेबाबत स्थानिक लोकांनी सांगितले की, रणजीत कुमार हे चंदिगडमध्ये हवाई दलात अधिकारी पदावर कार्यरत होते. दोनच दिवसांपूर्वी ते घरी आले होते. मात्र अचानक भुंग्यांच्या थव्याने त्यांच्यावर हल्ला करत घेरले. अनेक ठिकाणी भुंग्याने चावल्याने ते जखमी झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकारामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक आता घराबाहेर बसायला किंवा बाहेर पडायलाही घाबरत आहेत.