आधी राजीनामा अन् लगेच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार…; बिहारच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट
Bihar Political Crisis : नीतीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होणार... चार वर्षात बिहारमध्ये चौथ्यांदा नवं सरकार स्थापन होणार. बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. तिथे पुन्हा एकदा सत्ताबदल होणार आहे. एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. आज दुपारी चार वाजता बिहारला पुन्हा नवं सरकार मिळेल, अशी माहिती आहे.
पटना, बिहार | 28 जानेवारी 2024 : बिहारचं राजकारण कधी, कोणत्या क्षणी कोणतं वळण घेईल हे भले भले राजकीय जाणकारही सांगू शकत नाहीत. भल्या भल्यांचे अंदाज चुकतात. बिहारमध्ये सगळं अलबेल सुरु आहे, अशी चर्चा असतानाच बिहार राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. बिहारमध्ये पुन्हा सत्ताबदल होणार आहे. आज संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. जेडीयू अर्थात जनता दल युनायटेडचे नेते नीतीश कुमार आज नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज दुपारी चार वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.
10 वाजता महत्वाची बैठक
आज सकाळी 10 वाजता जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या निवासस्थानी एनडीएच्या विधिमंडळ पक्षांची बैठक होईल. या बैठकीनंतर नीतीश कुमार दुपारी 12 वाजता राज्यपालांना भेटतील. तेव्हा ते आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. हा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होईल. त्यानंतर नीतीश कुमार एनडीएतील मित्र पक्षांसोबत सत्ता स्थापनेचा दावा करतील. आज दुपारी नव्या सरकारचा शपथविधी होईल.
कुणाला किती मंत्रिपदं?
आज दुपारी चार वाजता नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. यावेळी भाजपच्या गोटातून दोन नेते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. तर HAM अर्थात हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी दोन मंत्रिपदाची मागणी केली आहे, अशी माहिती आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी मांझी यांना फोन करून इंडिया आघाडीत येण्याचं आमंत्रण दिलं आहे. तर HAM च्या तार आमदारांची बैठक झाली. या बैठकीत जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे HAM, अशी भूमिका मांडण्यात आली. मांझी यांनी नीतीश कुमार यांच्या नव्या सरकारमध्ये दोन मंत्रिपदांची मागणी केली आहे.
बिहार सचिवालयाची रविवारची सुट्टी रद्द
बिहारमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या सचिवालयाची आजची रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. याच सोबत राजभवनदेखील आज रविवारी सुरु असेल. यातून स्पष्ट होतं की, एनडीए सरकारचा शपथविधी आजच होणार आहे. भाजपचे नेते राधामोहन सिंह यांनी बिहारचे मुख्यमंत्री राजेंद्र आर्लेकर यांची राजभवनात जात भेट घेतली. त्यामुळे आता आज संध्याकाळी बिहारला पुन्हा नवं सरकार मिळणार आहे.