देशभरात खळबळ, कोण आहेत सत्यपाल मलिक? मोदी सरकारविरोधात मोठा गौप्यस्फोट, पुलवामा हल्ला झाला त्यावेळी….
सत्यपाल मलिक यांच्या आरोपांमुळे विरोधकांना मोदी सरकारविरोधात नवा मुद्दा मिळाला आहे. मलिक यांच्या आरोपांवरून काँग्रेस नेत्यांनी ट्विट करून पंतप्रधानांनी या आरोपांना उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारविरोधात सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या दाव्यांनी आज देशभरात खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर सत्यपाल मलिक हे नाव जोरदार चर्चेत आहे. तसेच त्यांनी केलेल्या दाव्यांवरून विरोधक आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत आहेत. सत्यपाल मलिक हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आहेत. २०१९ मध्ये पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात गृहमंत्रालयाची अक्षम्य चूक होती, त्यामुळेच हा हल्ला घडला, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. विशेष म्हणजे या प्रकरणावर मी बोलू नये, असाही दबाव आणला होता, असा गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी केलाय.
सत्यपाल मलिक यांचे आरोप काय?
२०१९ साली पुलवामा येथे झालेल्या हल्ल्ल्यात ४० जवानांचा मृत्यू झाला. मलिक यांनी यासाठी सीआरपीएफ आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला दोषी ठरवलंय. त्यावेळी राजनाथ सिंह हे गृहमंत्री होते. मलिक यांचा आरोप आहे की, सीआरपीएफने जवानांना घेऊन जाण्यासाठी विमान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र गृहमंत्रालयाने नकार दिला.तसेच सीआरपीएफची तुकडी जाताना संबंधित मार्गाची योग्य रितीने तपासणी झाली नाही, असाही आरोप करण्यात आलाय.
सत्यपाल मलिक ने जो सनसनीख़ेज खुलासा किया है, वो स्तब्ध करने वाला है।
PM मोदी को चुप्पी तोड़नी चाहिए, देश को बताना चाहिए कि आपने ख़ुद की सरकार की गलती को छिपाने का काम क्यों किया?
देश जवाब चाहता है। pic.twitter.com/zO15NgqcpL
— Congress (@INCIndia) April 15, 2023
सत्यापाल मलिक यांनी दावा केलाय की, याविषय़ी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉल केला असता, मोदींनी त्यांना गप्प बसण्यास सांगितलं.. या हल्ल्याचा ठपका पाकिस्तानवर फोडून फोडून निवडणुकीत लाभ घेण्याचा सरकारचा हेतू होता, असा आरोपही सत्यपाल मलिक यांनी केलाय.
पाकिस्तानातून ३०० किलोपेक्षा जास्त आरडीएक्स घएऊन आलेला ट्रक १० ते १५ दिवस काश्मीरमध्ये फिरत होता, मात्र गुप्तचर विभागाला याचा सुगावाही लागला नाही, असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केलाय.
राम माधव यांच्यावर आरोप
तसेच आरएसएस नेते राम माधव यांच्यावरही सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केलाय. एक दिवस राम माधव यांनी एका प्रकल्प मंजुरीच्या बदल्यात मला ३०० कोटी रुपये मिळू शकतात, अशी ऑफर दिली होती. मात्र मी ही ऑफर फेटाळून लावली, असं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलंय.
विरोधकांनी मुद्दा उचलला
सत्यपाल मलिक यांच्या आरोपांमुळे विरोधकांना मोदी सरकारविरोधात नवा मुद्दा मिळाला आहे. मलिक यांच्या आरोपांवरून काँग्रेस नेत्यांनी ट्विट करून पंतप्रधानांनी या आरोपांना उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.