ज्याने राज यांना उंदीर म्हटलं, तोच नेता म्हणतोय राज ठाकरे यांचं अयोध्येत स्वागत करू; असं काय घडलंय?
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. पण आता सिंह यांनी राज ठाकरे यांचं अयोध्येत स्वागत करणार असल्याचं म्हटलं आहे.
अयोध्या : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उंदीर आहेत. त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना अयोध्येच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाही. मग मिलिट्री आली तरी बेहत्तर, अशी डरकाळी फोडत भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणून बृजभूषण सिंह यांनी जोरदार आंदोलनही छेडलं होतं. त्यामुळे अयोध्येतील वातावरण तापलं होतं. त्यानंतर राज यांचा अयोध्या दौरा रद्द केला होता. मात्र, आता बृजभूषण सिंह यांनी सपशेल लोटांगण घेतलं आहे. राज ठाकरे अयोध्येत आले तर त्यांचं जंगी आणि जल्लोषात स्वागत करणार असल्याचं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांचे अयोध्येत जल्लोषात स्वागत होणार. आमचे त्यांच्याशी मतभेद नाहीत. अयोध्येत न येता राज ठाकरेंनी माझा सन्मान केला. आता त्यांचे अयोध्येत जल्लोषात स्वागत होणार आहे. आमचे महाराष्ट्रातील नेत्यांशी खूप चांगले संबंध आहेत. आम्ही कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून विरोध केलेला नाही, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज ठाकरे कधी अयोध्येला जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे चांगले नेते
यावेळी बृजभूषण सिंह यांना उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही चांगले नेते आहेत. या दोघांशीही माझे चांगले संबंध आहेत, असं बृजभूषण सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत आले होते. हे दोन्ही नेते अयोध्येतील हनुमान गढी येथे हनुमानाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी बृजभूषण सिंह यांनी त्यांचं शाल आणि गदा देऊन स्वागत केलं. तसेच या दोन्ही नेत्यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं.
म्हणून दौरा रद्द
दरम्यान, राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्याला बृजभूषण यांनी विरोध केला होता. राज ठाकरे यांच्या संघटनेने यूपी आणि बिहारच्या तरुणांना मारहाण केली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी आणि मगच अयोध्येत यावे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवता येणार नाही, असं म्हणज बृजभूषण यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख उंदीर असा केला होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण अयोध्येत प्रक्षोभक भाषणं देत आणि रॅली काढत राज ठाकरे यांच्या विरोधात वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता.