New Chief Minister of Tripura : त्रिपुराचे होणारे नवे मुख्यमंत्री माणिक साहा आहेत तरी कोण?
माणिक साहा हे त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. राजकारणात येण्यापूर्वी माणिक साहा त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचे. माणिक साहा आता बिप्लब देब यांच्या जागी त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार आहेत.
नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb)यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार माणिक साहा यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री (New Chief Minister)म्हणून निवड करण्यात आली आहे. त्रिपुराच्या राजकारणात शनिवारी (14 मे) अचानक खळबळ उडाली. बिप्लब देब यांनी अचानक मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तोही स्वीकारण्यात आला. यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांबाबत अटकळ सुरू झाली आणि अखेर माणिक साहांचे नाव पुढे आले होते. माणिक साहा हे त्रिपुराचे पुढील मुख्यमंत्री असतील. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी माणिक साहा (Manik Saha) यांच्या नावाचा निर्णय झाला आहे. मात्र माणिक मुख्यमंत्री झाल्याने काही आमदार नाराज असल्याचीही चर्चा आहे. तर त्या आमदारांनी बैठकीनंतर त्यांनी गोंधळ घातल्याचेही बोलले जात आहे. बिप्लब देब यांनी शनिवारी दुपारी साडेचार वाजता राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर बिप्लब म्हणाले, 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करावी लागेल. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर रिक्त झालेल्या त्रिपुरा भाजपचे अध्यक्षपद हे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्याकडे जाऊ शकते. तर बिप्लब देब यांनी एक दिवस आधी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यादरम्यान अमित शाह यांनी एका नव्या चेहऱ्यासह निवडणुकीत उतरायचे असल्याचे स्पष्ट केले होते.
कोण आहेत माणिक साहा?
मिळालेल्या माहितीनुसार, माणिक साहा हे त्रिपुरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते बिप्लब कुमार देब यांच्या जागी त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. लक्षात घेण्यासारखे आहे की राज्याच्या विधानसभा निवडणुका वर्षभरानंतर होणार आहेत. अशा स्थितीत बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा देताच भाजपने माणिक साहा यांचे नाव पुढे केले. बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर आता सर्वांच्या नजरा माणिक साहा यांच्याकडे लागल्या आहेत.
असा माणिक साहांचा राजकीय प्रवास
माणिक साहा हे पेशाने डेंटिस्ट आहेत. गेल्या वर्षी ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते आणि असे करणारे ते त्रिपुरातील एकमेव नेते आहेत. साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2020 मध्ये त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवले होते.
खेळाशीही संबंधित
मिळालेल्या माहितीनुसार, माणिक साहा हे त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. राजकारणात येण्यापूर्वी माणिक साहा त्रिपुरा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचे. माणिक साहा आता बिप्लब देब यांच्या जागी त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, बिप्लब देब यांनी त्रिपुरातील 25 वर्षे जुनी डाव्यांची सत्ता काढून टाकली आणि 2018 मध्ये भाजपला विजय मिळवून दिला होता. पण राज्याच्या विधानसभा निवडणुका वर्षभरानंतर होणार आहेत.
भाजपने 11 महिन्यांत 4 राज्यांचे मुख्यमंत्री बदलले
भाजपने गेल्या 11 महिन्यांत 4 राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. गेल्या वर्षी जुलै 2021 मध्ये तीरथ सिंह रावत यांच्या जागी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. त्याच महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी राजीनामा घेऊन त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले. यानंतर सप्टेंबरमध्ये विजय रुपाणी यांच्या जागी भूपेंद्रभाई पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. आता त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांची जागा माणिक साहा यांनी घेतली असून ते त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत.