BSF जवानांनी पाकिस्तानचा मोठा डाव उधळला, ड्रोनवर गोळीबार, अंमली पदार्थांची तस्करी उघड
बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानातून येणारं एक ड्रोन पाडलं. त्या ड्रोनमधून एक बॅग जप्त करण्यात आली आहे. त्यात तब्बल 11 किलो हेरॉईन असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
नवी दिल्ली : बीएसएफने पुन्हा एकदा पाकिस्तानचं (Pakistan) कारस्थान उधळून लावलं आहे. अमृतसरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी (Border Security Force) पाकिस्तानातून येणारं एक ड्रोन पाडलं. त्या ड्रोनमधून एक बॅग जप्त करण्यात आली आहे. त्यात तब्बल 11 किलो हेरॉईन असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यापूर्वी शनिवारी पाकिस्तानच्या ड्रोनने जम्मूच्या सीमा भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. बीएसएफ जवानांनी ड्रोनवर (Drone) गोळीबार केला. त्यानंतर ते ड्रोन पाकिस्तानात परतलं होतं. शनिवारी संध्याकाळी 7.25 आरएस पुरा उपविभागातील अरनिया परिसरात हा ड्रोन दिसून आला. अरनियाच्या आयबीजवळ हा ड्रोन पाहायला मिळाल्यानंतर सीमेवर तैनात बीएसएफ जवानांनी ड्रोनच्या दिशेनं 8 गोळ्या झाडल्या.
हा ड्रोन पाकिस्तानच्या बाजूने येत असल्याचं बीएसएफ जवानांना पाहायला मिळालं. ड्रोन भारतीय हद्दीत घुसताच जवानांनी त्यावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर ड्रोन लगेच परतला. या घटनेनंतर बीएसएफ जवानांनी सीमेवर शोधमोहीमही राबवली. अशा ड्रोनचा वापर पाकिस्तानकडून शस्त्रास्त्र किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीएसएफ जवानांनी ड्रोनवर केलेल्या गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तपास केला.
BSF troops foiled another smuggling attempt through Pakistan drone. Vigilant BSF troops fired at the drone coming from Pakistan & brought it down. The drone was carrying 9 packets: BSF Punjab Frontier pic.twitter.com/a0qLmnw4fd
— ANI (@ANI) May 9, 2022
महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तान सीमेवर सातत्याने ड्रोनच्या हालचाली पाहायला मिळत आहे. 29 एप्रिल रोजी पंजाबज्या अमृतसर सेक्टरमध्येही पाकिस्तानातून येणारं ड्रोन पाडण्यात आलं होतं. बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतसर सेक्टरमधील धानो कलान गावाजवळील भागात मध्यरात्री ड्रोन भारतीय हद्दीत घुसले होते.