Chandrayaan-3 Update | विक्रम लँडरमधून ‘रोव्हर’ बाहेर आला, तो क्षण ‘याची देही, याची डोळा’ अनुभवा, VIDEO
Chandrayaan-3 Update | इस्रोने शेअर केला तो खास व्हिडिओ. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर मिळून चंद्रावरील वातावरण, पुष्ठभाग, रसायन, भूकंप आणि खनिज याचा अभ्यास करणार आहेत.
बंगळुरु : भारताच महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मिशन यशस्वी ठरलं आहे. बुधवारी संध्याकाळी विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं. त्यानंतर आता तिथे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं संशोधन कार्य सुरु केलं आहे. तमाम देशवासियांसाठी हे अभिमानाचे क्षण आहेत. इस्रोच्या वैज्ञानिकांनी एक अवघड मिशन यशस्वी करुन दाखवलं. पृथ्वीवरुन चंद्रापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. पण भारतीय वैज्ञानिकांनी हे करुन दाखवलं. अखेरची 17 मिनिट मिशनसाठी खूप महत्त्वाची होती. पण यावेळी कुठलीही चूक न होता सहज लँडिंग झालं.
यशस्वी लँडिंगनंतर काही तासांनी विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला. त्याने तिथे संशोधन कार्य सुरु केलं आहे. आता इस्रोने विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला, त्या क्षणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
काय अभ्यास करणार?
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर मिळून चंद्रावरील वातावरण, पुष्ठभाग, रसायन, भूकंप आणि खनिज याचा अभ्यास करणार आहेत. इस्रोसह जगभरातील वैज्ञानिकांना यामुळे चंद्रावर अधिक अभ्यास करण्यासाठी माहिती मिळेल. रिसर्च अजून सोपा होईल.
… … and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W
— ISRO (@isro) August 25, 2023
विक्रम लँडरमधील चार पेलोड्स काय काम करणार?
रंभा – चंद्राच्या पुष्ठभागावर सूर्याच्या किरणांपासून येणाऱ्या प्लाज्मा कणाच घनत्वाचा अभ्यास करेल.
चास्टे – चंद्राच्या पुष्ठभागावरील तापमानाचा अभ्यास करणार.
इल्सा – लँडिंग साइटच्या आस-पास चंद्रावर भूकंप कशामुळे येतो, त्याचा अभ्यास करेल.
लेजर रेट्रोरिफ्लेक्टर एरे – चंद्राच डायनामिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार.
प्रज्ञान रोव्हरमधील दोन पेलोडस काय काम करणार?
लेजर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप (Laser Induced Breakdown Spectroscope – LIBS). चंद्राच्या पुष्ठभागावरील रसायनांच प्रमाण आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. त्याशिवाय खनिजांचा शोध घेईल.
अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (Alpha Particle X-Ray Spectrometer – APXS) हा एलिमेंट कंपोजिशनचा अभ्यास करेल. मॅग्नेशियम, अल्यूमिनियम, सिलिकन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि टिन लँडिंग साइटच्या आसपास चंद्राच्या पुष्ठभागावर या घटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न होईल.