Corona Update : कोरोनाचा धोका पुन्हा वाढला; या राज्यांमधून 24 तासात झाले 3-3 मृ्त्यू; महाराष्ट्राची परिस्थिती नेमकी काय..?
कालच्या तुलनेत कोरोनाची 50 टक्के कमी प्रकरणे समोर आली आहेत. राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 667 एवढी झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहेत. गेल्या 24 तासात दिल्लीत कोरोनाचे 484 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर 26.58 टक्के नोंदवला गेला आहे. एकीकडे दिल्लीत रुग्णसंख्या वाढत असून राजस्थान आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे नवे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत दिल्लीत 1 हजार 821 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
तर दिल्ली सरकारकडून दिल्लीत 3 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहेत. हे सगळे मृ्त्यू झालेले कोरोनामुळे झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
तर राजस्थानच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 197 नवीन रुग्ण आढळले आहेत.
या दरम्यान राज्यात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राजधानी जयपूरमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्याचेही त्यांनी सांगितले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, राजस्थानमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 804 वर पोहोचली आहे, असून आरोग्य विभागाने जोरदार काम सुरु केले आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्रातही कोरोनाचे 328 नवे रुग्ण, तर 1 जण मृत्यू पावला आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 328 नवीन रुग्ण आढळले असल्यामुळे आरोग्य विभाग आता अलर्ट मोडवर आला आहे.
एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी महाराष्ट्रात 788 नवे रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत 50 टक्के कमी प्रकरणे समोर आली आहेत. राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 667 एवढी आहे.