Corona Updates : दिल्लीत पुन्हा कोरोना वाढला; दिवसाला 1 हजार रुग्ण; मृत्यूचा आकडाही वाढला
दिल्लीसह देशातील अनेक शहरांमधून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वंही जाहीर करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता दोन दिवसानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालाची वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. गेल्या 24 तासामध्ये दिल्लीत कोरोनाचे एक हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, दिल्लीत 24 तासामध्ये कोरोनाचे 1095 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाचा संसर्ग दर 22.74 टक्के नोंदवल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या आरोग्य हेल्थ बुलेटिनमध्ये राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या 4995 असल्याचे सांगण्यात आले आहे.
तर त्यापैकी 3596 होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर 303 रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल केल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे.
दिल्लीत सोमवारी कोरोनाचे 689 नवीन रुग्ण आढळले असून कोरोनाच्या संसर्गामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसानंतर म्हणजेच मंगळवारी दिल्लीत कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढल्याचेही त्यांनी सांगितले. तर कोरोना बाधितांची संख्याही वाढली असून सध्या भीतीदायक वातावरण दिल्लीत असल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीत कोरोनाचे एक हजारहून कमी नवीन रुग्ण रविवारी आढळले होते. तर दिल्ली सरकारच्या हेल्थ बुलेटिननुसार, 23 एप्रिल रोजी दिल्लीत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 948 झाली होती.तर यामध्ये दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दिल्लीसह देशातील अनेक शहरांमधून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वंही जाहीर करण्यात आली आहेत.