Kejriwal Bungalow Case | मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानावर 45 कोटी खर्च केला? पहिली Action अधिकाऱ्यांवर, त्यानंतर….
Kejriwal Bungalow Case | "सामान्य लोकांच्या पैशातून अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्यावर 45 कोटी रुपये खर्च केले. ज्यात महागडे पडदे, डायर पॉलिश वियतनामी मार्बल आणि महागड्या वस्तूंचा समावेश असल्याचा आरोप आहे"
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकीय दृष्ट्या अडचणीत येऊ शकतात. आधीच केजरीवाल सरकारमधील दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. त्यातच आता अरविंद केजरीवाल सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणामुळे अडचणीत येऊ शकतात. यावरुन विरोधकांनी केजरीवाल यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आता सतर्कता विभागाने केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरण विषयात पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सरकारी बंगला फ्लॅगस्टाफ रोड येथील सिव्हील लाइन 6 येथे आहे. दक्षता विभागाकडून पीडब्लूडीच्या 7 अधिकाऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
बंगल्याच्या नूतनीकरणावर किती कोटी खर्च केल्याचा आरोप?
पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना या नोटीसाचे उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला आहे.
फक्त कपाटावर 11 कोटी खर्च?
भाजपाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरुध्द प्रदर्शन केले होते. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. त्यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले होते. भाजपाचे नेते हरीश खुराना यांनी म्हटले होते की, “जो व्यक्ती कट्टर इमानदार असल्याचा दावा करतो, तो व्यक्ती आपल्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 45 कोटी रुपये खर्च करतो. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्यातील कपाटावर 11 कोटी खर्च केल्याचा आरोप आहे.
कॉंग्रेस नेत्यांनी केले हे आरोप
यातच, दिल्ली काँग्रेसचे माजी अध्यक्ष अजय माकन यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. सामान्य लोकांच्या पैशातून अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या बंगल्यावर 45 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. ज्यात महागडे पडदे, डायर पॉलिश वियतनामी मार्बल आणि महागड्या वस्तूंचा समावेश आहे. कुठले मंत्री जेलमध्ये?
अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय असलेल मनीष सिसोदिया भ्रष्टाचाराच्या आरोपात जेल मध्ये आहे. सत्येंद्र जैन हे देखील जेलमध्ये आहेत. आपचे अनेक नेते सीबीआय, ईडीच्या रडारवर आहेत.