जम्मू-काश्मीरमध्ये बैसाखी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, नदीवरील पूल तुटल्याने हाहाकार
बैसाखी यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिरात जाण्यासाठी नदीवर एक लोखंडी पूल होता. या पुलावरुन नदी ओलांडून भाविक मंदिरात चालले होते. इतक्यात अचानक जे घडले त्याने एकच हाहाकार उडाला.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बैसाखी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेदरम्यान नदीवरील लोखंडी पूल तुटल्याने एकच हाहाकार उडाला. अपघातात 20 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस-प्रशासनाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना पुलाखालून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेचा व्हि़डिओही व्हायरल झाला आहे.
ओव्हरलोडमुळे पूल कोसळला
चेनानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेनी संगम मंदिरात बैसाखी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक आले होते. नदीवरील पूल ओलांडून मंदिरात जावे लागते. या नदीवर जुना लोखंडी पूल होता. यात्रेला आलेल्या भाविकांची पुलावर मोठी गर्दी झाली होती. आधीच कमकुवत झालेला पूल भक्तांच्या गर्दीमुळे खाली कोसळला. पुलाच्या मध्यावरच भेग पडली आणि पूल जमीनदोस्त झाला.
आतापर्यंत 20 जखमी झाल्याची माहिती
या दुर्घटनेत पुलावरील भाविक नदीत पडून जखमी झाले. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 20 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि मदत पथकाकडून अद्याप बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेचे व्हिडिओही समोर आला आहे. ओव्हरलोडिंगमुळे पूल कोसळल्याचे उधमपूर जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही.