काँग्रेस अध्यक्षपदासाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया, जानेवारीत काँग्रेसला मिळणार पूर्णवेळ अध्यक्ष
बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसच्या विशेष समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष बनवण्यावर विचार विनिमय करण्यात आला.
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूक आणि मध्य प्रदेशसह अन्य राज्यांच्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येईल आणि जानेवारीमध्ये काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती पक्की मानली जात आहे. (Discussion of change of leadership once again in Congress)
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने RJD सोबत महाआघाडी करत 70 जागा लढवल्या होत्या. त्यात काँग्रेसला फक्त 19 जागा जिंकता आल्या. त्यामुळे RJD नेते तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं. काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरुनही RJD ला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली.
बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसच्या विशेष समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष बनवण्यावर विचार विनिमय करण्यात आला. मात्र, सोनिया गांधी यांनी स्वत:ला या बैठकीपासून दूर ठेवलं. सोनिया गांधी या सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांच्या त्या आई आहेत. त्यामुळे त्यांनी या बैठकीपासून दूर राहणं पसंत केलं. समितीवर कुठलाही दबाव पडू नये आणि समिती स्वतंत्रपणे पक्षाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा करेल, हा त्यामागील उद्देश होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकांना आमच्याकडून आशा उरल्या नाहीत- सिब्बल
अलीकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली.
काँग्रेस नेत्यांचा ‘लेटर बॉम्ब’
यापूर्वी कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’वरून बराच गदारोळ माजला होता. यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संबंधित बातम्या:
बिहार विधानसभा ते पोटनिवडणुका, मोदी है तो मुमकीन हैं : योगी आदित्यनाथ
Discussion of change of leadership once again in Congress