50 लाखांचा फ्लॅट नको रे बाबा! या आठ शहरातील लोकांची बदलतेय चाँईस
गेल्या वर्षी 8 प्रमुख शहरांमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांची विक्री 16 टक्क्यांनी घटून 98,000 युनिट्सवर आली आहे. त्याचवेळी 1 कोटींहून अधिक किमतीच्या घरांचा हिस्सा 2022 मधील 27 टक्क्यांवरून 2023 मध्ये 34 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
नवी दिल्ली | 04 जानेवारी 2024 : प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यात एक स्वप्न असते ते म्हणजे स्वताचे हक्काचे घर. त्यासाठी दिवस रात्र एक करून तो हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो. हे घर परवडणारे असावे आणि त्यात सोई सुविधा असाव्यात अशा घरांना सर्वाधिक पसंती असते. मात्र, एका अहवालामधून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. देशातील 8 प्रमुख शहरातील नागरिकांनी परवडणाऱ्या घरांकडे पाठ फिरविली आहे असे या अहवालात म्हटले आहे. या शहरातील लोकांनी घर किंवा फ्लॅट घेण्याची आपली चाँईस बदलली आहे.
रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रँक इंडियाचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये मध्यम उत्पन्न गट आणि लक्झरी गृहनिर्माण विभागात वाढलेल्या मागणीमुळे 50 लाख आणि त्याहून कमी किमतीच्या निवासी मालमत्तांची विक्री घसरली आहे. 2022 मध्ये 1,17,131 इतके फ्लॅट विकले गेले होते. मात्र, 2023 मध्ये ही संख्या घसरून 97,983 युनिट्सवर आली आहे असे म्हटले आहे.
परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात सर्वात मोठी घसरण ही बेंगळुरूमध्ये दिसून आली. किमतीत वाढ आणि गृहकर्जावरील जास्त व्याज यामुळे घरांच्या विक्रीत घट झाली. ही घट देशातील 8 प्रमुख शहरामध्ये झाली आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ष 2023 मध्ये परवडणाऱ्या घरांचा विक्री वाटा 37 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्याचवेळी 1 कोटींहून अधिक किमतीच्या घरांचा हिस्सा 2022 मधील 27 टक्क्यांवरून 2023 मध्ये 34 टक्क्यांपर्यंत वाढला आहे असेही यात म्हटले आहे.
नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, अधिक महागड्या मालमत्तेकडे वळल्यामुळे गृहनिर्माण बाजारपेठेत 2023 मध्ये चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षी देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांची विक्री 16 टक्क्यांनी घसरून 98,000 युनिट्सवर आली आहे. मालमत्तेच्या किमतीत झालेली वाढ आणि गृहकर्जावरील जास्त व्याज यामुळे घरांच्या विक्रीत घट झाल्याचे त्यांनी सांगितले.
ही आहेत ती 8 शहरे
दिल्ली (एनसीआर), मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद या शहरातील सर्व किंमतींच्या श्रेणीतील घरांची विक्री गेल्या वर्षी 5 टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांच्या पुरवठ्यात सुमारे 20 टक्क्यांनी घट झाली. त्याचा परिणाम परवडणाऱ्या निवासी घरांच्या विक्रीवर झाला.
मुंबईतही विक्री कमी झाली
मुंबईमध्ये 50 लाख आणि त्याहून कमी किमतीच्या घरांची विक्री 2023 मध्ये सहा टक्क्यांनी घसरली. मुंबईत एका वर्षात केवळ 39,093 घरे विकली गेली. तर गेल्या वर्षी 41 हजार 595 घरे विकली गेली होती. परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात सर्वात मोठी घसरण बेंगळुरूमध्ये दिसून आली. बेंगळुरूमध्ये ही संख्या 8 हजार 141 युनिट्स इतकी आहे. 2022 मध्ये हाच आकडा 15 हजार 205 युनिट इतका होता.